प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर, डाक बंगला कॉर्नरवरील रस्त्याची समस्या अद्यापही संपुष्टात आली नाही. या ठिकाणी वाहने अडकण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. गुरुवारी सकाळी पुन्हा एक टिप्पर अडकल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. येथील समस्यांचे ग्रहण कधी सुटणार? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
जुन्या महात्मा फुले रोडवर ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळी शहापूर डाक बंगल्यासमोर खोदाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या ठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार सुरू होते. रस्ता व्यवस्थित करण्यात आला नसल्याने अवजड वाहने तसेच प्रवासी रिक्षा अडकण्याचे प्रकार सुरू होते. महात्मा फुले रोडला जोडणारा रस्ता वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद होता. या ठिकाणी काम सुरू असल्याने सहा महिने जेसीबी थांबून होता. यामुळे वाहनधारकांनाही अडचणीचे बनले होते. याबाबत तक्रारी वाढल्याने खोदण्यात आलेले खड्डे बुजवून माती घालून कच्चा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, सदर रस्ता व्यवस्थित करण्यात आला नसल्याने खडी घेऊन जाणारा टिप्पर गुरुवारी सकाळी अडकला. सदर टिप्पर एक फूट मातीमध्ये रुतल्याने मोठी अडचण झाली. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अडकलेला टिप्पर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. शेवटी वाहनातील साहित्य काढून जेसीबीने रुतलेले वाहन काढण्यात आले. सदर ठिकाणी वाहने अडकण्याचा प्रकार नेहमीचा बनला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.









