मण्णूर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी : अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा पंपिंग स्टेशन ते मण्णूर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने दिवसेंदिवस अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवार दि. 1 रोजी सकाळी पुन्हा येथून जाणारी मालवाहू ट्रक रस्त्याकडेला पलटी झाली. यामुळे ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून चालक व क्लिनर मात्र सुदैवानेच बचावले आहेत. पण, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पूर्णतः उखडून गेलेल्या हिंडलगा पंपिंग स्टेशन ते मण्णूर व गोजगा ते उचगाव अशा सुमारे सात ते आठ किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ होऊन वर्ष उलटले. तरी देखील कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा आणि सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. संबंधित कंत्राटदार आठवडय़ातून एक ते दोन दिवस काम सुरू करून गायब होत आहेत. सहा महिन्यांपूर्वी रस्ता कामाला प्रत्यक्षात सुरुवात करून रस्ता रुंद करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उरलेला काही ठिकाणचा डांबरही उखडण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजुंनी रुंदीकरण करण्यासाठी रस्ता खोदून त्यामध्ये मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे सर्वत्र दगड आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी रस्त्यावर विखुरलेल्या खडी आणि दगडांमुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. तर येथून होणाऱया क्वॉरीतील अवजड वाहतुकीमुळे धुळीचे प्रचंड लोळ उडू लागले आहेत. याचा वाहनधारकांसह परिसरातील शेतकऱयांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असून, पिकांचे नुकसान होत आहे. तर रस्त्याकडेची माती खचल्याने अवजड वाहने शेतवडीत पलटी होण्याच्या घटना घडत आहेत.
सोमवारी सकाळी पुन्हा असाच अपघात घडला असून मण्णूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱया मालवाहू ट्रकचा (एम. पी. 09 एच. एच. 9702 ) टायर मातीत रुतल्याने अचानक बाजुच्या शेतवडील उलटली. यावेळी चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. पण, ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा मण्णूर व गोजगा ग्रामस्थांनी दिला आहे.









