घुणकी / प्रतिनिधी :
लॉकडाऊन च्या काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेचा उपयोग कसा करायचा या विवंचनेत असणाऱ्या किणी (ता. हातकणंगले) येथील युवकांनी एक नामी शक्कल लढवली आहे. निसर्गमित्र प्रमोद माळी यांच्या नेतृत्वाखाली काही युवकांनी गावातील पाणंद रस्ते आणि छोट्या मोठ्या ओघळ जे नैसर्गिक जलप्रवाहांचे मुख्य घटक आहेत, त्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. पण या उपक्रमात सोशल डिस्टनसिंग, तोंडाला मास्क व हातमोजे यांचा सर्रास वापर करूनच हे कार्य करण्याचे ठरवले. 30 एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 111 व्या जयंतीदिनी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. अवघ्या 3 दिवसात सुमारे 25 पोती प्लास्टिक व 6 पोती रिकाम्या दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर सशक्त ग्रामजीवनाचा अखंड जागर केला.
ग्रामोनत्ती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. ग्रामजीवन कसं असावं याबद्दल त्यांनी त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथात विवेचन केले आहे. त्यानुसार त्यांच्या विचार आणि प्रत्यक्ष कृतीचा जागर करून त्यांना अभिवादन करण्यासाठी ही तरुणाई एकवटली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्याला जोडणाऱ्या घुणकी व तळसंदेला जाणारा पाणंद रस्ता हत्तीमाळ म्हणून ओळखला जातो.या पाणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मोठं मोठ्या झाडांच्या गर्द सावलीत विसावणारा हा पाणंद रस्ता मद्यपींसाठी निवांत ठिकाण…त्यामुळे रहदारीबरोबरच हा पाणंद रस्ता ओपन बार म्हणूनही कुप्रसिद्ध होतोय. गेल्या 3 दिवसात हत्तीमाळ पाणंद रस्त्याच्या स्वच्छतेचे काम या युवकांनी हातात घेतले. यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेले प्लास्टिक, दारूच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आल्या. 12 तास मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पायाखालची वाट आणि नैसर्गिक जलप्रवाहांचा मार्गही सुकर करावा या उद्देशाने ही तरुणाई राबत आहे. यामध्ये वैभव कुंभार, मधुकर निकम, प्रा. कुबेर पाटील, धनंजय कुंभार, अभिजित कुंभार, अर्जुन निकम यांचेसह अनेक युवक या सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आहेत. याचबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातून एखादा कोणी आडमार्गाने जात असेल तर त्याच्यावरही नजर ठेवली जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.









