यंत्रविज्ञान क्षेत्रात विविध चमत्कार घडविणाऱया जपानने एक अशी बस तयार केली आहे, की, जी रस्त्यांप्रमाणेच रेल्वेमार्गांवरुनही धावू शकणार आहे. विशेष म्हणचे मार्ग आणि रुळ या दोन्हींवर तिचा वेग अनुक्रमे 100 आणि 60 किलोमीटरच्या आसपास राहणार आहे. या बसची सेवा शनिवारपासून प्रायोगिक तत्वावर सुरु झाली आहे. या बसला ‘डय़ूएल मोड व्हेईकल’ (डीएमव्ही) असे नाव देण्यात आले आहे. या मिनीबसला दोन्ही माध्यमांमधून प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी टायरची आणि लोहाची अशी दोन्ही चाके बसविण्यात आली आहेत.
ज्यावेळी ही बस सर्वसामान्य मार्गांवरुन प्रवास करते तेव्हा तिची टायरची चाके कार्यरत होतात. ज्यावेळी ती रुळांवरुन प्रवास करते, तेव्हा टायरची चाके वरच्या बाजूस सरकतात आणि लोहाची चाके कार्यरत होतात. त्यामुळे ती विनासायास दोन्ही प्रकारच्या मार्गांवर धावू शकते. यामुळे ही बस-कम-रेल्वे कोठेही प्रवास करण्यास सक्षम आहे. जेथे रेल्वेमार्ग नाहीत, तेथे ती साध्या मार्गाने जाईल आणि जेथे रेल्वेमार्गांची सोय आहे, तेथे ती रुळांवरुन धावणार आहे.
त्यामुळे तिची उपयोगक्षमता वाढली आहे. या बसचा रेल्वेट्रकवरील वेग वाढविण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बसचे व्यवस्थापन एएसए कॉस्ट रेल्वे कंपनी नामक कंपनीकडे आहे. जपानच्या अनेक शहरांमध्ये, जेथे लोकांना रेल्वे आणि बस अशा दोन्ही माध्यमांमधून प्रतिदिन प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी हे वाहन विशेष उपयोगाचे आहे. कारण या बसचा उपयोग केल्यास संपूर्ण प्रवासात वाहन बदलावे लागणार नाही. त्यामुळे प्रवस लवकर आणि सुखदायी होईल. भारतातही कदाचित भविष्यात अशी बस धावू लागेल, अशी शक्यता अनेकजण आता व्यक्त करीत आहेत.