उन्हाच्या तप्त किरणांनी वातावरणात उष्मा निर्माण झाला आहे. पदोपदी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. किती कडक हे ऊन जीव जातोय की काय, असे म्हणण्याची वेळ सध्या शहरवासियांवर येऊन ठेपली आहे. अशा उन्हातच नजरेस कलिंगड दिसले रे दिसले की इतर फळे वगळता कलिंगड खरेदीवर ग्राहकांकडून अधिक भर दिला जात आहे. याच्या सेवनाने शरीराला गारवा मिळत असून मन तृप्त होते. त्यामुळे शनिवारचा आठवडी बाजार हा अशाच आतून लाल व बाहेरुन हिरव्या रंगाच्या गोड मधुर कलिंगडांनी फुलून गेला आहे.

उन्हाळय़ात मिळणारे कलिंगड हे आपल्यासाठी वरदानच आहे. यामध्ये 90 टक्के अंश पाण्याचा असतो. त्यामुळे गरमीमध्ये याचे सेवन शरीरासाठी लाभदायक ठरते. शिवाय उन्हातून आल्यानंतर कलिंगडाचे सेवन केल्यास घामामुळे जाणवणारा थकवा नाहिसा होऊन उत्साह वाढतो. कलिंगड हे फळ मूळ आफ्रिकेतील असून सध्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात याचे जोमाने पीक घेतले जाते. याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळत असून तहान भागण्यासही मदत होते. उन्हाळय़ात प्रत्येकाच्या घरी याचा आस्वाद आवर्जुन घेतला जातो. बालचमुंच्या तर अगदी आवडीचे फळ असल्याने बालचमुही कलिंगडाचा आस्वाद मनमुरादपणे लुटतात.
सध्या बाजारात ठिकठिकाणी कलिंगडाचे आगमन झाले असून त्याच्या लहान मोठय़ा आकारावरुन त्याचे दर लावण्यात आले आहेत. अगदी 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत कलिंगड बाजारात उपलब्ध आहेत इतकेच काय तर महाविद्यालय, शाळा, औद्योगिक क्षेत्र आदी ठिकाणी देखील कलिंगडाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या मार्गावरुन ये-जा करणारे वाटसरु, नोकरदारवर्ग, विद्यार्थीवर्गाला हे स्टॉल्स दिसताच यावर ताव मारला जात आहे. मीठ व चटपटीत मसाल्याची फवारणी करुन कलिंगड एका प्लेटमधून आईस्क्रीमच्या काडय़ांना अडकवून खायला दिले जातात. त्यामुळे कलिंगड खरेदी करुन घरी जाऊन खाण्याइतपत संयम नसणाऱया मंडळींकडून रस्त्यावर उभारलेल्या प्रुट ज्युस स्टॉल्सवर याचा रस अथवा याचे काप खरेदी करुन आनंदाने खाल्ले जात आहेत.
औषधी गुणधर्म :
- कलिंगड हे अल्कली गुणमर्धाचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱया आजारांवर ते उपयोगी ठरते.
- उष्णतेने शरीरातील पाणी घामाच्या स्वरुपात बाहेर फेकले जाते. अशावेळी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यावेळी याचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमरता भासत नाही.
- कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असून त्यामध्ये पोटॅशियम व फॉस्फरस ही पोषक तत्वे अधिक प्रमाणात आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी दोन्ही असतात.
- कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तीवर्धक म्हणून केला जातो. या बियांमध्ये कुम्बोट्रिन नावाचा ग्लुकोसाईड घटक असतो. या फळातील साखर सहजपणे शरीरात विरघळत असल्याने हे फळ शरीरासाठी आरोग्यपूर्ण आहे.
- उन्हाच्या दिवसात शरीरात पाण्याचा अंश अधिक प्रमाणात ठेवण्यासाठी अनेक लोक या कलिंगडाचे सेवन करतात. यामुळे तणाव नाहीसा होऊन शरीर ताजेतवाने होते.
- कलिंगड शक्तीवर्धक, दाहशामक, पौष्टिक व शरीराला शीतलता प्रदान करणारे एकमेव फळ आहे.
- कलिंगडामध्ये पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर हे खाल्ल्यास फायदा होतो.
- उष्णतेमुळे डोळय़ाची व तळपायाची आग होत असल्यास कापलेल्या कलिंगडाची साल त्या जागेवर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.
काही दक्षता :
कलिंगड हे एकदा कापून पुन्हा फ्रिजमध्ये ठेऊन दुसऱया दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्याच्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणूनच ते लगेच खावे. अनेकजण त्यात मीठ टाकून खातात, परंतु कलिंगडामध्ये नैसर्गिकरित्याच सोडीयम क्लोराईड, पोटॅशियम हे क्षार असतात. यामध्ये मीठ टाकल्यास क्षारांचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे मीठ, साखर याचा वापर न करता आहे त्या नैसर्गिक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्यास अनेक वेळा अन्न विषबाधा होऊन जुलाब, उलटय़ा, ताप, सर्दी, खोकला हे आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
बाजारात वाढ : कलिंगडाला बाजारात अधिक मागणी आहे. त्यामुळे तांत्रिक यंत्राच्या सहाय्याने अनेक लोक याचे उत्पादन सध्या 12 महिनेही घेऊ लागले आहेत. 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत याचा दर बाजारात लावण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून 30 ते 50 रुपयांपर्यंत दर लावण्यात आले आहेत.
-शिवानी पाटील









