मुंबई / ऑनलाईन टीम
गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंदर्भात केलेला आरोप पूर्णपणे खोटे आहेत. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत. त्यांनी 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आरोप खोडून काढत भाजप महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कारस्थान करत असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना केला.
नवाब मलिक म्हणाले की, पोलीस बदलीची नियमावली माहित असताना देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत आहेत. सरकारल बदनाम करण्याचा कट फडणवीस करत आहेत. रश्मी शुक्ला कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप करत होत्या. राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही रश्मी शुक्ला अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. रश्मी शुक्ला भाजपच्या एंजट या नात्याने हे काम करत होत्या. पोलीस अधिकारी बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस ज्या अहवालाचा दाखला देत आहेत त्यातल्या 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नाहीत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस हे चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. ते आज ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला यांची बाजू घेत होते त्यावरुन फडणवीसांचा खोटेपणा उघड झाला आहे. पोलीस बदल्यांच्या रॅकेटवेळी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेऊन फोन टॅप करण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. मात्र, गृहमंत्रालयाची अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला या अनेक लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करायच्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.