युक्रेनवरील हल्ल्यांमुळे फेडरेशनने घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ लॉसेन
विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) मंजूर केलेल्या रशिया व बेलारुस येथील सर्व बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत. रशियाने युक्रेनवर मिलिटरी कारवाई करीत हल्ला केल्याने हा निर्णय घेतला असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले.
रशिया व बेलारुस यांचे राष्ट्रध्वज व त्यांचे राष्ट्रगीत कोणत्याही बीडब्ल्यूएफची मान्यता असलेल्या स्पर्धेत वाजविले जाणार नाही. तसेच पुढील सूचना येईपर्यंत या दोन देशांना कोणतीही नवी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. युक्रेनमधील परिस्थितीवर बीडब्ल्यूएफचे बारीक लक्ष असून संबंधित भागीदारांशी या संदर्भात चर्चा करून रशिया व बेलारुस यांच्याविरुद्ध आणखी कडक उपाय योजले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सर्व क्रीडा फेडरेशन्सना रशिया व बेलारुस येथे होऊ घातलेल्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही हा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रीडा चळवळीला पाठिंबा देत संबंधितांना हिंसाचाराचे कृत्य थांबवून शांतता निर्माण करण्याचे आम्ही आवाहन करीत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठवडय़ात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर 14 मुलांसह एकूण 352 नागरिकांचे बळी गेले असल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी रविवारी सांगितले. बेलारुसही रशियाची मदत करीत असून युक्रेनवरील आक्रमण हे ‘स्पेशल ऑपरेशन’ असल्याचे रशियाने म्हटले आहे. विश्व फुटबॉलवर नियंत्रण ठेवणाऱया फिफानेही रशियात यापुढे एकही आंतरराष्ट्रीय सामना ठेवला जाणार नसल्याचे सांगितले. याशिवाय रशियाच्या विदेशातील फुटबॉल सामन्यांत त्यांचा राष्ट्रध्वज व त्यांच्या राष्ट्रगीताला बंदी घातली असल्याचेही फिफाने जाहीर केले









