युक्रेनवरून संघर्षाची भीती ः अमेरिकेने पाठविली शस्त्रास्त्रांची खेप
वृत्तसंस्था / कीव्ह
युक्रेनमध्ये स्वतःच्या हातचे बाहुले असलेले सरकार रशिया आणू पाहत असल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. स्वतःचे समर्थन करणारा नेता युक्रेनच्या सत्तेवर आणण्याचा प्रयत्न रशियाने चालविला असून याकरता त्याचे गुप्तचर अधिकारी युक्रेनच्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याचे ब्रिटनकडून म्हटले गेले. तर रशियाने ब्रिटनचे हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
रशियाचे सरकार युक्रेनचे माजी खासदार येवेन मुरायेव्ह यांना रशिया समर्थक नेतृत्वासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पाहत आहे. युक्रेनमध्ये रशिया समर्थक नेतृत्व स्थापन करण्याचा कट आम्ही सहन करणार नाही. युक्रेनमध्ये सैन्य घुसखोरी एक मोठी व्यूहात्मक चूक ठरेल आणि रशियाला कठोर निर्बंधांना तोंड द्यावे लागणार असल्याचे ब्रिटनच्या विदेशमंक्षी लिस ट्रस यांनी म्हटले आहे.
रशियाचा कट चिंताजनक
ब्रिटनची गुप्तचर माहिती खरी असल्याचे आमचे मानणे आहे. रशियाचा कट चिंताजनक आहे. युक्रेनच्या लोकांना स्वतःचे भविष्य ठरविण्याचा अधिकार आहे. युक्रेनमध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या नेत्यांसोबत आम्ही उभे आहोत असे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्या एमिली हॉर्न यांनी म्हटले आहे. ब्रिटनने युक्रेनमधील आणखीन चार नेते रशियाच्या गुप्तचर अधिकाऱयांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. युक्रेनवर हल्ल्याची योजना आखणारे रशियन गुप्तचर अधिकारी देखील यात सामील आहेत.
अमेरिकेने उचलले पाऊल
अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांची पहिली खेप युक्रेनमध्ये पोहोचली आहे. मागील आठवडय़ात अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी कीव्हचा दौरा केला होता. अमेरिकेने 200 दशलक्ष डॉलर्सचे सुरक्षा सहाय्य पॅकेज युक्रेनकरता जाहीर केले आहे. युक्रेनचे सार्वभौमत्व आणि रशियाच्या आक्रमणाच्या विरोधात रक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये युक्रेनचे समर्थन करण्यासाठी अमेरिका मदत करणार राहणार असल्याचे त्याच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.
संशयास्पद राजकीय नेता
45 वर्षीय मुरायेव्ह हे रशिया समर्थक राजकारणही असून ते युक्रेनच्या पाश्चिमात्य शक्तींसोबत आघाडीच्या निर्णयाला विरोध करत आहेत. मुरायेव्ह हे नाशी नावाच्या एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. अलिकडेच त्यांनी देश अमेरिकेला विकण्याचा आरोप सरकारवर केला होता.
रशियाचा हस्तक्षेप
युक्रेनच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याचा रशियाचा हा पहिलाच प्रयत्न नाही. 2004 मध्ये देखील रशियाने युक्रेनच्या अध्यक्षीय निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात ऑरेंज क्रांतीची निर्मिती झाल्याने क्रेमलिनचा पसंतीचा उमेदवार यानुकोविच यांचा पराभव झाला होता. 2013 मध्ये देखील यानुकोविच विरोधात लोक रस्त्यांवर उतरले होते.
रशियाचे सैन्य सीमेसमीप
युक्रेन आता युद्धाच्या उंबरठय़ावर आहे. रशियाचे सैन्य त्याच्या सीमेपासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर हल्ल्यासाठी तयार असल्याचे चित्र आहे. अमेरिका आणि त्याचे सहकारी नाटो देश हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास ते रशिया विरुद्ध पाश्चिमात्य देश असे ठरण्याची भीती आहे. युद्धाची शक्यता पाहता ब्रिटनने युक्रेनला रणगाडाविरोधी शस्त्रास्त्रs पुरविली आहेत. तर कॅनडाने स्वतःची पॅरा ट्रूपर रेजिमेंट युक्रेनमध्ये पाठविली आहे.









