मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक एलेक्सेई नवलनी यांना जर्मनीमधून रशियात परतताच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवलनी यांना तत्काळ मुक्त केले जावे असे अमेरिकेने म्हटले आहे. तर युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी एलेक्सेई यांची मुक्तता करण्याचे आवाहन रशियाच्या अधिकाऱयांना केले आहे. नवलनी यांनी कैदेच्या निलंबित शिक्षेच्या अटींचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नवलनी हे 20 ऑगस्ट रोज सायबेरिया येथून मॉस्को येथे जात असताना विमानात गंभीर आजारी पडले होते आणि कोमात गेले होते.
जर्मनीत 5 महिन्यांपर्यंत उपचार करवून घेतल्यावर रशियातील विरोधी पक्ष नेते नवलनी रविवारी मॉस्को येथे पोहोचले होते. नवलनी यांच्यावर विषप्रयोग झाल्याने ते कोमात गेले होते. हा विषप्रयोग क्रेमलिनने (रशियाचे राष्ट्रपती भवन) केल्याचा आरोप आहे.









