दिवसभरात आढळले 10,633 नवे रुग्ण : जगभरात 35,00,812 बाधित : 2,45,048 जणांचा बळी
जगभरात 35 लाख 812 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 लाख 45 हजार 048 जणांनी जीव गमावला आहे. तसेच 11 लाख 28 हजार 469 जणांनी कोरोनावर मात करण्यास यश मिळविले आहे. रशियातील कोरोना संकट गडद होत चालले असून मागील 24 तासांत 10,633 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्णांची संख्या आता 1 लाख 34 हजार 687 वर पोहोचली आहे. रशियाने मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) च्या निर्यातीवरील तात्पुरती बंदी हटविली आहे. मागील महिन्यात रशियाने ही बंदी लादली होती. रशियात आतापर्यंत 1,280 जणांना जीव गमवावा लागला आहे.
युएई : भारतीय उद्योजकाचा मृत्यू

अबू धाबीमध्ये 62 वर्षीय भारतीय उद्योजकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पीके करीम हाजी हे केरळचे रहिवासी होते. हाजी यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे पुत्र मोहम्मद अब्दुल गफूर यांनी दिली आहे. हाजी हे अबू धाबी केरळ मुस्लीम सांस्कृतिक केंद्राचे माजी अध्यक्ष आणि भारतीय इस्लामिक केंद्र तसेच सुन्नी केंद्राचे सक्रिय होते. हाजी यांना मधुमेहाचा त्रास होता.
न्यूझीलंडमध्ये कारवाईला वेग

न्यूझीलंडमध्ये मागील आठवडय़ात तिसऱया पातळीची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. न्यूझीलंड पोलिसांना निर्बंधांच्या उल्लंघनाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत 1200 पेक्षा अधिक तक्रारींची नोंद झाली असून यातील 685 तक्रारी केवळ 1-2 मे या कालावधीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी 112 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकेत 11 लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत एका दिवसात 28 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. अल्बामा आणि आयडाहोसह अनेक प्रांतांनी निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ केला आहे. टेक्सास प्रांतातील 2 लाख 90 हजार लोकांवरील स्टे-ऍट-होम आदेश हटविण्यात आला आहे. कॅलिफोर्नियात स्टे-ऍट-होम आदेशाच्या विरोधात निदर्शने करणाऱया सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या नागरिकांनी एकजूट व्हावी

देश आणि जगासाठी सद्यकाळ आव्हानात्मक तसेच महत्त्वपूर्ण आहे. या संकटसमयी सर्वांनी परस्परांबद्दल सहानुभूती दाखवावी. आम्ही अनेकदा अशा संकटाला तोंड दिल्याचे उद्गार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बूश यांनी काढले आहेत. प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि सिनेटचे नेते मिच मॅककोनेल यांनी ट्रम्प प्रशासनाच्या रॅपिड कोरोना चाचणीचा प्रस्ताव फेटाळला आहे.
ब्रिटन : अतिरिक्त निधी मंजूर

ब्रिटनचे सरकार कोरोनामुळे ग्रस्त दुर्बल घटकांच्या मदतीसाठी आणखीन 76 दशलक्ष पौंड निधी वितरित करणार असल्याची माहिती मंत्री रॉबर्ट जेनरिक यांनी दिली आहे. घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण आणि कमकुवत मुलांचा यात समावेश असेल. व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी 617 दशलक्ष डॉलर्सची मदत केली जाणार आहे.
मुलाला दिले डॉक्टरचे नाव

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी स्वतःच्या मुलाला दोन डॉक्टरांवर आधारित नाव दिले आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाला विल्प्रेंड लॉरी निकोलस हे नाव दिले आहे. डॉ. निक प्राइस आणि डॉ. निक हार्ट यांच्या नावावर हे नाव देण्यात आले आहे. माझी प्रकृती पाहता डॉक्टरांनी मृत्यूच्या घोषणेची व्यवस्था केली होती, असा दावा जॉन्सन यांनी केला आहे.
स्पेनमध्ये मास्क अनिवार्य

स्पेनमध्ये सोमवारपासून सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मास्क परिधान करणे अनिवार्य ठरले आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सरकार 60 लाख मास्क परिवहन केंद्रांवर तसेच 70 लाख स्थानिक अधिकाऱयांना वितरित करणार असल्याचे सांगितले आहे. स्पेनमध्ये टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे. स्पेनमधील मागील आठवडय़ात 14 वर्षीय मुलांना घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे.
चीनमध्ये दोन नवे रुग्ण

चीनमध्ये मागील 24 तासांदरम्यान दोन नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. नॅशनल हेल्थ कमिशननुसार शनिवारी चीनमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या 82,877 झाली असून 4,633 जणांना जीव गमवावा लागला आहे. वुहान शहरात कोरोनाचा आता एकही रुग्ण सक्रीय नाही. वुहान या शहरातूनच कोरोनाचा जगभरात फैलाव झाला आहे.
फ्रान्समध्ये आणीबाणी वाढणार

महामारीला तोंड देण्यासाठी आणीबाणीचा कालावधी दोन महिन्यांनी वाढविला जाणार असल्याचे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मंगळवारी संसदेसमोर मांडला जाणार आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1,68,396 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 24,760 जणांना जीव गमवावा लागला आहे. आणीबाणीच्या विरोधात फ्रान्समध्ये आता निदर्शने होऊ लागली आहेत.
इटलीत 474 बळी

इटलीत शनिवारी 474 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. इटलीतील मृतांचा आकडा आता 28,710 वर पोहोचला आहे. इटलीच्या नागरी सुरक्षा विभागानुसार देशातील 79,914 जणांना कोरोना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. इटलीतील कोरोनाबाधितांची संख्या 2,09,328 झाली आहे.









