कमी वेतन, अर्धवट प्रशिक्षणाची स्थिती : रशियाच्या सैनिकांचा ‘बंडखोरी’चा इतिहास जुना
युक्रेनमध्ये रशियाचे सैन्य मागे हटत आहे. अशा स्थितीत रशियाच्या सैन्याने स्वतःची अनेक उपकरणे नष्ट केली आहेत. तसेच रशियाच्या अनेक सैनिकांनी युक्रेनशी युद्ध लढण्यास आणि आदेशांचे पालन करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. काही सैनिकांनी स्वतःच्याच कमांडरवर हल्ला केला. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या संघर्षादरम्यान सुमारे 15 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. हे प्रमाण अफगाणिस्तानात 9 वर्षांमध्ये मारले गेलेल्या सोव्हियत संघाच्या (आता रशिया) सैनिकांइतकेच आहे.
रशियाच्या सैनिकांचे मनोबल खचल्याने अशा स्थितीत ते बंड करण्याची शक्यता आहे. लढाई सोडून पलायन केलयाने सैन्याचा शारीरिक आणि मनोवैज्ञानिक उत्साह कमी होईल, तर या सैनिकांनी गट बदलल्यास किंवा शत्रूच्या सैन्यात प्रवश केल्यास युक्रेनला मदत मिळू शकते. रशिया किंवा सोव्हियत सैनिकांनी एखाद्या संघर्षात आदेश मानण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ नाही. रशिया-जपान युद्धादरम्यान रशियाच्या सैनिकांनी जून 1905 मध्ये बंड केले होते. इतिहासाच्या प्रसिद्ध घटनांमध्ये याची नोंद आहे.
पूर्वी देखील बंडाची घटना
सुशिमाच्या लढाईत रशियाच्या नौदलाचा बहुतांश ताफा नष्ट झाला होता आणि त्याच्याकडे अनुभवहीन सैनिक उरले होते. शिळे मांस वाढण्यासह काम करण्याच्या खराब स्थितीला तोंड देत असलेल्या 700 नौसैनिकांनी स्वतःच्या अधिकाऱयांच्या विरोधातच बंड केले होते. चेचन्यासोबत रशियाच्या पहिल्या संघर्षात (1994-96) मोठय़ा संख्येत सैनिक युद्धमैदान सोडून आले होते.
कधीपर्यंत लढणार रशियाचे सैनिक?
युद्धभूमीवरील अडचणी, लढाईत खराब कामगिरी आणि युद्धामुळे वैचारिक प्रतिबद्धता कमी झाल्याने सैनिक युद्धमैदान सोडून पलायन करू शकतात. परंतु रशियाचे सैनिक आताच मनोबल खचणे आणि सहकार्य न मिळण्याच्या स्थितीला सामोरे जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसलेल्या सैनिकांचे मनोबल खचल्याचे समोर आले आहे.
अत्यल्प वेतन
2014 मध्ये रशियाच्या 25 टक्क्यांपेक्षा अधिक सैनिकांना स्वतःच्या इन्प्रंटीची उपकरणे हाताळता आली नव्हती. पुतीन यांच्या काळात सैन्याचे बजेट वाढले तरीही सैनिकांचे वेतन वाढलेले नाही. करारबद्ध सैनिकांना अमेरिकेच्या तुलनेत 200 टक्के कमी वेतन दिले जाते.
रशियाला अपयश रशियाच्या सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्याचे जनरल आता युद्धभूमीत उतरले आहेत. या स्थितीमुळे कमीत कमी 7 जनरल्सचा मृत्यू झाला आहे. रशियाला युक्रेनच्या लोकांची मने जिंकण्यास आणि बौद्धिक स्तरावर यश मिळविण्यास अपयश आले. आता तर स्वतःच्या सैनिकांची मने जिंकण्यासाठी देखील रशियाला झगडावे लागत आहे.









