अनेक इमारतींचे मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ बेलगोरोड
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुरुवारी रात्री रशियाच्या लढाऊ विमानाने चुकून स्वतःच्याच शहरात बॉम्बवर्षाव केला आहे. युक्रेन सीमेला लागून असलेल्या बेलगोरोड शहरावरून रशियाचे सुखोई-34 लढाऊ विमान जात होते. यावेळी वैमानिकाने चुकून बॉम्ब इजेक्ट केला आहे. या हल्ल्यात 2 महिला जखमी झाल्या असून अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर ज्या ठिकाणी बॉम्ब कोसळला तेथे 65 फूट आकाराचा खड्डा तयार झाला आहे.
बॉम्बच्या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा असल्याने पूर्ण शहर जागे झाले. बेलगोरोडच्या गव्हर्नरांनी त्वरित इमर्जन्सी लागू केली. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सुखोई लढाऊ विमानातून कुठल्या प्रकारचा बॉम्ब पाडविण्यात याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बेलगोरोड शहर युक्रेनच्या सीमेपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर युक्रेनचे शहर खारकीव्हच्या उत्तर दिशेला आहे. युक्रेनमध्ये दाखल होण्यासाठी रशियाची लढाऊ विमाने या शहरावरून झेपावत असतात. यापूर्वी 24 जून रोजी रशियाच्या सैन्याने स्वतःच्याच हवाई सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य केले होते.









