युक्रेनकडून दावा ः
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता 21 दिवस पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान युक्रेनकडून रशियाच्या सैन्याच्या मेजर जनरलला ठार करण्यात आले आहे. मेजर जनरल ओलेग मित्येव्ह हे 150 व्या मोटराइज्ड रायफल डिव्हिजनचे कमांडर होते. युद्धाच्या 21 दिवसांमध्ये रशियाच्या 4 वरिष्ठ सैन्याधिकाऱयांना जीव गमवावा लागला आहे.
यापूर्वी रशियाच्या सैन्याचे मेजर जनरल विताली गेरासिमोव्ह, मेजर जनरल एंड्री सुखोवेत्स्की आणि रशियन फोर्स हेडक्वार्टरचे डेप्युटी चीफ मेजर अँड्रीये बुर्लाकोव्ह यांना खेरसान प्रांतात जीव गमवावा लागला होता. अँड्रीये हे रेजिमेंट चीफ ऑफ स्टाफ देखील होते. त्यांच्यावर युद्धादरम्यान अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया होत्या.
युक्रेनवरील ब्लादिमीर पुतीन यांचा हल्ल्याचा निर्णय रशियाच्या अर्थव्यवस्थेला किमान 30 वर्षे मागे ढकलणार आहे. अर्थतज्ञ, गुंतवणुकदारांनुसार कमीत कमी पुढील 5 वर्षांसाठी रशियातील राहणीमानाची पातळी घटणार आहे.
रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान पोहोचविण्याचा दावा युक्रेनकडून सातत्याने करण्यात येतोय. रशियाचे आतापर्यंत 12 हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर 57 विमाने, 353 रणगाडे, 83 हेलिकॉप्टर नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा आहे. याचबरोबर 125 तोफा, 1165 सैन्यवाहनांचे नुकसान झाले आहे.









