ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आजचा बारावा दिवस आहे. या युद्धाची तीव्रता वाढत असून, रशियाकडून युक्रेनमधील शहरांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यामुळे अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी पोलंडकडून अमेरिकेला एक ऑफर देण्यात आली होती. युक्रेनला आपली जुनी विमानं देण्याची तयारी पोलंडने दर्शवली होती. परंतु, या बदल्यात पोलंडने अमेरिकेकडे एफ 16 फायटर जेटसची मागणी केली होती. परंतु, पुतीन यांच्या धमकीनंतर पोलंडनं आपला प्रस्ताव माघारी घेतला आहे.
युक्रेनचं हवाई क्षेत्र ‘नो फ्लाय झोन’ घोषित करावं, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. परंतु, झेलेन्स्की यांची मागणी नाटोनं नाकारली. त्यामुळे झेलेन्स्की यांनी रशियाला प्रत्यूत्तर देण्यासाठी लढावू विमानांची मागणी केली होती. पोलंडनं आपली मिग-29 आणि सुखोई-25 ही लढावू विमाने युक्रेनला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अमेरिकेनं या बदल्यात आपली एफ-16 विमानं पोलंडला द्यावीत, अशी मागणी पोलंडनं केली होती. या प्रस्तावाबाबत पोलंडशी चर्चा सुरू असून त्याला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आल्याची माहिती रविवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी माहिती दिली होती.
मात्र, त्यानंतर जो देश युक्रेनची मदत करेल तो देश युद्धात सहभागी आहे, असं मानलं जाईल’ अशी धमकी पुतीन यांनी दिल्यानंतर पोलंडनं आपले पाऊल मागे घेतले आहे. आता पोलंड युक्रेनला कोणतीही शस्त्रास्त्रे पुरविणार नसल्याचे सांगण्यात येते.