वृत्तसंस्था/ मॉस्को
जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत रशियाच्या 35 ऍथलीट्सना त्रयस्थ झेंडय़ाखाली (न्युट्रल फ्लॅग) सहभागी होण्याची परवानगी दिली असल्याची माहिती विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनने दिली आहे. आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत त्रयस्थ झेंडय़ाखाली सहभागी होणाऱया खेळाडूंची संख्या 62 झाली आहे.
आंतरराष्ट्रीय फिल्ड आणि ट्रक स्पर्धेत रशियाचे अनेक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याची माहिती विश्व उत्तेजकविरोधी संघटननेने (वाडा) प्रसिद्ध केल्यानंतर 2015 पासून रशियाच्या ऍथलेटिक्स फेडरेशनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत रशियाचे 35 ऍथलीट्स त्रयस्थ झेंडय़ाखाली फिल्ड आणि ट्रक प्रकारात सहभागी होणार आहेत.









