वृत्तसंस्था/ झुरीच
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू असल्याने 2023 साली होणाऱया आंतरराष्ट्रीय आईस हॉकी फेडरेशनच्या विश्व कनिष्ठांच्या स्पर्धेचे रशियाचे यजमानपद रद्द करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय आईस हॉकी फेडरेशनच्या मंडळाची बैठक तातडीने बोलाविण्यात आली होती. रशिया आणि युक्रेन यांच्यातील असलेल्या समस्या चर्चेद्वारे सामोपचाराने मिटविता आल्या असत्या पण रशियाने लष्कराचा वापर करत युक्रेन विरूद्ध युद्ध सुरू केले आहे. या बैठकीमध्ये रशियन तसेच बेलारूसच्या सर्व राष्ट्रीय संघावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2023 च्या आंतरराष्ट्रीय आईस हॉकी विश्व कनिष्ठांच्या स्पर्धेचे रशियाचे यजमानपदही रद्द करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 26 डिसेंबर 2022 ते 5 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये या स्पर्धेच्या नव्या यजमानपदाचा शोध घेतला जाईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.









