रशियन वृत्तसंस्थेच्या पेजवर बंदीनंतर उचलले पाऊल
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या राष्ट्रपतींनी फेसबुक आणि ट्विटरच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. रशियाने फेसबुकवर बंदी घातली आहे. तर मेटा या कंपनीने रशियाच्या विरोधात यापूर्वीच कारवाई केली होती. रशियाची सेंसरशिप एजेंसी रोसकोम्नाडजोरने फेसबुकवर रशियाच्या प्रसारमाध्यमांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
फेसबुकने अलिकडेच रशियाच्या आरटी आणि आरआयए वृत्तसंस्थेच्या पेजवर बंदी घातील होती. रशिया सरकारच्या सेंसरशिप एजेन्सीने फेसबुकवर बंदीची घोषणा केली आहे.
लाखो लोकांना विश्वासार्ह माहितीपासून रशिया वंचित करत असल्याचा आरोप फेसबुकने केला आहे. फेसबुकवर बंदी घातल्यावर रशियाने ट्विटरवरही कारवाई केली आहे. रशियातील ट्विटर सेवेवर बंदी घालण्यात आली असून याकरता एका विधेयकावर स्वाक्षरी केली गेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत देशातील सशस्त्र दलांविषयी ‘खोटी’ माहिती फैलावल्यास कुठल्याही व्यक्तीला 15 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
बीबीस, अमेरिकेच्या प्रशासनाची व्हॉइस ऑफ अमेरिका आणि रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टी, जर्मन वाहिनी डॉयचे वेले, आणि लातव्हियामील मेडुजा संकेतस्थळावरही रशियाने बंदी घातली आहे. रशियन भाषेत वृत्त प्रकाशित करणाऱया विदेशी आउटलेट्सच्या विरोधात सरकारच्या व्यापक कारवाईमुळे पुतीन यांची आक्रमक भूमिका स्पष्ट झाली आहे. युक्रेनवर आक्रमणासंबंधी रशियातील जनतेला चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप रशियाकडून सातत्याने केला जातोय.
रशियाच्या संसदेकडून कठोर कायदा
रशियाच्या संसदेने शुक्रवारी फेक न्यूजवरून कठोर कायद्याची घोषणा केली होती. युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याच्या विरोधात फेक न्यूज चालविण्यात येत असल्याचा संसदेचा आरोप आहे. संसदेत संमत या नव्या कायद्यात सैन्याच्या विरोधात जाणूनबुजून बनावट वृत्त फैलावल्यास 15 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.









