नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या निलंबित असलेल्या रशियाचा संघ विश्व ऍथलेटिक्स संघटनेचा जबाबदार व पूर्ण वेळ सदस्य असावा, अशी माझी खूप इच्छा आहे. पण, या देशातील डोपिंगचा मुद्दा नजीकच्या काळात निकालात लागेल, असे वाटत नाही, असा उल्लेख विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी केला आहे. 2015 मध्ये वाडाच्या चाचणीत ट्रक व फिल्डचे ऍथलिट उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने रशियाला निलंबित केले गेले होते.
‘रशियातील डोपिंगचा मुद्दा निकाली लागावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण, नजीकच्या कालावधीत असे काही होईल, याची मला खात्री वाटत नाही. वास्तविक, रशियासारखा देश खेळाबाहेर बसावा, हे खेळाच्या दृष्टीने चांगले नाही’, असे को पुढे म्हणाले. रशियाला यापूर्वी ऑगस्टमध्येच वर्ल्ड ऍथलेटिक्स संघटनेकडून लादलेला भरभक्कम दंड भरावा लागला आहे. विश्व ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष 64 वर्षीय सेबॅस्टियन को हे स्वतः दुहेरी ऑलिम्पिक सुवर्णजेते आहेत.