दोन वर्षांसाठी नियुक्ती : 30 जून रोजी पदभार स्वीकारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
छत्तीसगड पॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची नवे रॉ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. त्याच दिवशी रवी सिन्हा भारताच्या देशाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.
वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकारी रवी सिन्हा यांची सोमवारी (19 जून) भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (रॉ) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते छत्तीसगड केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या पॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत असून आता विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल यांची जागा घेतील.

रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिह्यातील रहिवासी आहेत. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले असून 1988 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे.
‘रॉ’ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली होती. 1968 पर्यंत गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबी हीच संस्था भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर कारवायांवर लक्ष ठेवत होती. परंतु 1962 आणि 1965 च्या युद्धात भारताची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यानंतर सरकारने 1968 मध्ये ‘रॉ’ नावाची स्वतंत्र गुप्तचर संस्था स्थापन केली होती. इंदिरा गांधी सरकारमध्ये रॉ अस्तित्वात आली. गुप्तचर ऑपरेशन्स, भारताच्या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे ‘रॉ’चे मुख्य काम आहे. सद्यस्थितीत ही संस्था पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. ‘रॉ’ ही संस्था थेट पंतप्रधानांना अहवाल देते.









