नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr व त्यांच्या सहकाऱयांनी अ व कनिष्ठ संघांच्या प्रशिक्षक पथकाशी भविष्यातील नियोजनाविषयी चर्चा केली. राष्ट्रीय लॉकडाऊन सुरु असताना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यावर यात प्रामुख्याने भर देण्यात आला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविडने या ऑनलाईन चर्चेसाठी विशेष पुढाकार घेतला.
शास्त्री, द्रविड यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, पारस म्हाम्ब्रे, नरेंद्र हिरवाणी, अभय शर्मा, सितांशू कोटक यांनी या सत्रात सहभाग घेतला. मागील आठवडय़ात हे चर्चासत्र संपन्न झाल्याचे सूत्राने नमूद केले.
‘ही ऑनलाईन चर्चा म्हणजे कोचिंग क्लास नव्हते. हा केवळ परिसंवाद मानता येईल. प्रशिक्षकांचा दृष्टिकोन, त्यांचे भविष्यातील प्रशिक्षणविषयक नियोजन आदी बाबी यात समजावून घेण्यात आल्या. माझ्या मते, ही संवादाची प्रक्रिया यापुढेही विविध स्तरावर कायम ठेवली जाईल’, असे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सूत्राने सांगितले.
‘शास्त्री, अरुण व श्रीधर यांच्यासारखे वरिष्ठ प्रशिक्षक सहभागी होत असतील तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच लाभ होतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन चर्चा आयोजित करण्यास कोणतीच अडचण आली नाही. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल आणि भारतीय क्रिकेटला नव्याने सुरुवात होईल’, अशी अपेक्षा या सूत्राने पुढे व्यक्त केली.









