प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकातील आमदार सी. टी. रवी यांची अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय मुख्य सचिवपदी निवड केली होती. आता त्यांच्याकडे दक्षिण भारतातील राज्यांचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यामुळे एका युवा नेत्याकडे पक्षातील महत्त्वाचे पद देण्याचा प्रयत्न भाजपश्रेष्ठींनी केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या मुख्य सचिवांना जबाबदारीचे वाटप केले असून सी. टी. रवी यांच्याकडे दक्षिण भारतातील राज्यांचे भाजपचे प्रभारीपद दिले आहे. त्यामुळे सी. टी. रवी यांना कर्नाटकसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या पाच राज्यांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. यापूर्वी त्यांनी तामिळनाडूचे भाजप प्रभारी म्हणूनही काम केले आहे.
हायकमांडच्या निर्णयावर बेंगळूरमध्ये प्रतिक्रिया देताना आमदार सी. टी. रवी म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे निभावून नेण्याचा विश्वास आपल्याला आहे. दक्षिण भारतात भाजप संघटना मजबूत करण्यासाठी परिश्रम घेईन, असे सांगितले. कर्नाटकातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडण्यासंदर्भात दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्हय़ातील सुगन झैनापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये बुधवारी पहाटे पुन्हा जोरदार चकमक झाली. मंगळवारपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. ठार झालेल्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा खतरनाक कमांडर रियाझ नायकू याच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर दहशतवाद्यांनी मंगळवारीच एका भाजप नेत्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान एका जवानाला प्राण गमवावे लागले होते. शोपियानमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना कोरोना
हुबळी : केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन झालो आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मंगळवारीच ते नवी दिल्लीहून बेळगावला आले होते. तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह काही नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.









