भारताच्या अन्य तीन मल्लांना कांस्यपदके
वृत्तसंस्था/ इस्तंबुल, तुर्की
येथे झालेल्या यासर दोगू मानांकन सिरीज कुस्ती स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविणाऱया भारताच्या रवी दाहियाने सुवर्णपदक पटकावले. याशिवाय भारताच्या अन्य मल्लांनी तीन कांस्यपदकेही पटकावली.
61 किलो वजन गटातील चुरशीच्या अंतिम लढतीत रवीने उझ्बेकिस्तानच्या गुलोमॉन अब्दुल्लाएव्हवर 11-10 असा केवळ एका गुणाने विजय मिळवित जेतेपद पटकावले. 8-10 असे पिछाडीवर पडल्यानंतर रवीने शेवटच्या चालीत अप्रतिम खेळ करीत तीन गुण मिळवून विजय साकार केला. रवीने त्याआधी उपांत्य फेरीत इराणच्या मोहम्मदबाघेर इस्माईल याखेशीला हरविले होते. याशिवाय 92 किलो वजन गटात भारताच्या दीपक पुनियाने कझाकच्या एल्खान असादोव्हवर 7-1 अशी मात करून कांस्यपदक मिळविले तर 57 व 60 किलो गटात अनुक्रमे अमन व ज्ञानेंद्र यांनीही कांस्यपदके मिळविली.









