कोरोनाचा संसर्गाचा रोज होतोय फैलाव
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे सत्र कायम आहे. काल रविवारी 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 111 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 818 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 1761 झाली आहे. एकूण 936 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाने 7 बळी घेतले आहेत. सातवा बळी रविवारी वास्कोतील नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांचा गेला आहे.
नवीन कोरोना पॉझिटिव्ह व बळींची संख्या वाढत असल्याने व कोरोनाचा संसर्ग शहरांसोबत गावातही पसरला असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना पर्यटन, हॉटेल्स, मंदिरे खुली करण्यात येत असल्याने जनतेमध्ये आश्चर्य तसेच संतापही व्यक्त होत आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे. परंतु सरकारला कोणते आणि कोणाचेही सोयरसुतक नाही, असे एकंदरीत चित्र दिसून येते.
सरकारला मंत्री-आमदारांची काळजी, जनतेची नाही
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे कोणतीही उपाययोजना झालेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना नियंत्रणाची जबाबदारी आता आपल्या सहकारी मंत्र्यांवर ढकलली असून त्यांनी कोरोना रोखावा, असे त्यांनी सूचित केले आहे. मंत्री, आमदारांना कोरोनाची भीती वाटते आणि तो होऊ नये म्हणून विधानसभा अधिवेशन एका दिवसावर आणले परंतु जनतेची काळजी घेण्यासाठी काहीही केले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रुग्णवाहिकांची संख्या पडते कमी
कोरोना पॉझिटिव्ह वाढत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सरकारच्या 108 नंबरच्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. अनेकवेळा 108 रुग्णवाहिका अपघातग्रस्त किंवा इतर रुग्णांना आणण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा कोरोना रुग्णांसाठी त्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. 108 ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या वाढवा, अशी मागणी होत आहे. एकंदरीत आरोग्य खात्यावरील जबाबदारी वाढत आहे. वाढत्या रुग्णांसाठी रुग्णवाहिकेसह आरोग्य कर्मचारी देखील कमी पडत असल्याचे चित्र आहे.









