सामाजिक अंतराचा फज्जा : नागरिकांची खरेदीसाठी झुंबड : बॅरिकेड्समुळे गैरसोय : विनामास्क नागरिकांवर कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारने सोमवार दि. 10 मे ते 24 मेपर्यंत 14 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केल्याने रविवारीही नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी किराणा दुकाने, मेडिकल, डेअरी, भाजीपाला वगळता अन्य दुकाने कुलूपबंद असलेली पाहायला मिळाली. मात्र खडेबाजार येथे रमजानच्या पार्श्वभूमीवर काही विपेत्यांनी कपडे, चपला, गॉगल, ड्रायप्रुट्स यासह अन्य वस्तू रस्त्यावर विक्रीसाठी ठेवल्या होत्या. नागरिकांकडून सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असला तरी सर्वांनी मास्क परिधान केल्याचे दिसून आले.
काही नागरिकांनी शनिवारीच सर्व खरेदी उरकली होती. मात्र, नोकरदार वर्गाचा रविवार हा सुटीचा दिवस असल्याने ते जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना दिसून आले. खरेदीसाठी सकाळी 6 वाजल्यापासून हळूहळू गर्दी वाढत गेली. त्यानंतर सुमारे 5 ते 6 तास नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
बॅरिकेड्सच्या आजूबाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा
शहरातील सर्व प्रमुख मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. गणपत गल्ली येथे तिन्ही बाजूने बॅरिकेड्स लावल्यामुळे बॅरिकेड्सच्या आजूबाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एरव्ही गणपत गल्लीत फेरीवाले, फळ, फूल विपेते आणि दुचाकीधारकांची गर्दी दिसून येते. रविवारी बॅरिकेड्स लावल्यामुळे फक्त पादचारीच या मार्गावरून ये-जा करतानाचे चित्र दिसून आले.
14 दिवस लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्याऐवजी कडधान्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली. यावेळी 12 वाजण्याच्या सुमारास भाजी विपेते कमी दराने भाजी विक्री करत असल्याचे दिसून आले. खडेबाजार, गणपत गल्ली, कांदा मार्केट, लिंबू मार्केट, रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौक यासह परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई
बाजारात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर पोलिसांची करडी नजर होती. मास्क नसलेल्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 12 नंतर खडेबाजार पोलीस स्टेशनचे निरीक्षक धीरज शिंदे यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत शहराचा फेरफटका मारून चालू असलेली सर्व दुकाने बंद केली. यावेळी पोलीस आयुक्तांनीही शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि धीरज शिंदे यांना सूचना दिल्या. एकंदरीत शहरात सकाळच्या सत्रात गर्दी दिसून आली तर दुपारी 12.30 नंतर बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती.
बाजार गल्ली वडगाव येथे नागरिकांची गर्दी
लॉकडाऊन होणार असल्याने नागरिकांनी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शनिवारपासून सुरुवात केली होती. रविवारी बाजार गल्ली वडगाव येथे खरेदीसाठी सकाळी 6 ते 12 पर्यंत नागरिकांची झुंबड उडाली. यावेळी सामाजिक अंतर राखले जात नव्हते आणि बहुतांश नागरिक तसेच विपेते मास्क व्यवस्थित न लावता दिसून येत होते. अन्नधान्य, भाजी, फळे आणि इतर गोष्टींचा साठा करण्याकडे नागरिकांचा कल होता.
खानापूर रोडवरील डी मार्टसमोर नागरिकांची मोठी रांग
रविवारी सकाळी खानापूर रोडवरील डी-मार्टसमोर नागरिकांची मोठी रांग लागली होती. अत्यावश्यक वस्तू लॉकडाऊन काळातही ठराविक वेळेत मिळणार आहेत, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले असले तरीदेखील लोकांची या रांगेमध्ये भर पडतच असल्याचे पाहायला मिळत होते. 10-15 जणांना एका वेळी आत खरेदीसाठी सोडण्यात येत होते. नागरिक खरेदीसाठी रांगेत संयमाने उभे राहिल्याचे दिसत होते.
शहापूर परिसर दुपारी 12 नंतर बॅरिकेड्स लावून बंद
रविवारी दुपारी 12 नंतर शहापूरचा नाथ पै चौकापर्यंतचा परिसर पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून बंद केला होता. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून नागरिक शहराच्या प्रत्येक बाजारपेठ परिसरात गर्दी करताना दिसत होते. अत्यावश्यक वस्तू या काळात कमी पडू नये यासाठी बहुसंख्य नागरिक बाजारपेठेत आलेले दिसून येत होते. परंतु शहर पोलिसांनी शहापूर परिसरात होणाऱया गर्दीवर निर्बंध म्हणून रविवारी दुपारी 12 नंतर नाथ पै चौकापर्यंतचा परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला होता.









