सकाळी 10 ते 2 या वेळेत दुकाने राहणार सुरू, विशेष बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील किरकोळ व्यापाऱयांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने रविवार पेठेतील होलसेल व्यापाऱयांना दुकाने सुरू ठेवून व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले असून दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतच व्यापाऱयांनी दुकाने सुरू ठेवावीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. रविवार पेठेतील होलसेल व्यापाऱयांची सोमवारी बैठक बोलाविण्यात आली होती.
आमदार अनिल बेनके, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., एसीपी एन. व्ही. बरमणी आदींसह विविध अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. रविवार पेठेत मालवाहतूक करणारी वाहने दररोज पहाटे 5 ते सकाळी 9.30 या वेळेतच अनलोड करावीत. त्यानंतर ही वाहने त्वरित रविवारपेठेतून बाहेर काढावीत, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. यावेळी मंत्री सुरेश अंगडी यांनी उपस्थित व्यापाऱयांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि निश्चित केलेल्या वेळेचे पालन करून व्यापारीवर्गाने प्रशासन आणि पोलीस खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले. आमदार अनिल बेनके यांनी लॉकडाऊन असतानाही रविवारपेठेत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले. तसेच जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याचेही सांगितले. यापुढे रविवारपेठेतील व्यापाऱयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य दरातच वस्तुंची विक्री करावी, अशी सूचना बेनके यांनी केली.
एसीपी एन. व्ही. बरमणी यांनीही मार्गदर्शन केले. बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी. दिलेल्या वेळेतच माल वाहतूक करणाऱया वाहनांची ये-जा करावी असे सांगितले. बैठकीस रविवारपेठेतील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.









