वृत्तसंस्था/ हेडिंग्ले
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरी क्रिकेट कसोटी हेडिंग्लेच्या मैदानावर 25 ऑगस्टपासून खेळविली जाणार आहे. या कसोटीत भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्व़िनला कदाचीत पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजाला पहिल्या दोन कसोटी सामन्यात बळी मिळविता न आल्याने संघ व्यवस्थापन जडेजाच्या जागी अश्विनला संधी देण्याचा विचार करीत आहे.
पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने लॉर्डस्ची दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.लीडस्च्या तिसऱया कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना अश्विनला संधी दिली तर जडेजाला वगळले जाण्याची शक्यता आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत जडेजाने 16 षटकांची गोलंदाजी केली पण त्याला एकही बळी मिळविता आला नाही. लॉर्डस्च्या दुसऱया कसोटीत जडेजाने 28 षटकांत 48 धावा दिल्या पण त्याला एक गडी बाद करता आला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण ठेवण्यात जडेजा यशस्वी ठरू शकला नाही. दरम्यान इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अलीने दुसऱया कसोटीत तीन बळी मिळविले होते.
भारतीय संघाच्या या संपूर्ण इंग्लंड दौऱयामध्ये जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीचा आढावा घेतला तर अश्विन प्रभावी वाटत आहे. जडेजाने इंग्लंडच्या दौऱयात आतापर्यंत केवळ 2 गडी बाद केले आहेत. आयसीसीच्या विश्व कसोटीत चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील अंतिम लढतीत जडेजाने 2 गडी बाद केले होते. तसेच त्याने सरावाच्या सामन्यात 1 बळी मिळविला. रविंचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दौऱयामध्ये आतापर्यंत 7 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 4 बळी मिळविले होते तर सरावाच्या सामन्यात सरेच्या दुसऱया डावात 27 धावांत 6 गडी अश्विनने बाद केले होते. तिसऱया कसोटीसाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी अश्विनच्या गोलंदाजीला साथ देईल असा अंदाज आहे.









