नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजा कन्कशन व धोंडशिरेच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असेल, असे सध्याचे संकेत आहेत. कॅनबेरातील उद्घाटनाच्या टी-20 सामन्यात जडेजाला दुखापत झाली होती.
32 वर्षीय रविंद्र जडेजा आपली 50 वी कसोटी खेळण्याच्या उंबरठय़ावर असून तूर्तास त्याला किमान 3 आठवडे सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले की, आयसीसी कन्कशन तरतुदीनुसार डोक्याच्या कोणत्याही दुखापतीनंतर सदर खेळाडूला किमान 7 ते 10 दिवस विश्रांती घ्यावी लागते. त्यामुळे, जडेजा सराव सामन्यात खेळू शकत नव्हता आणि सराव सामन्यात खेळणार नसल्याने संघव्यवस्थापन त्याला थेट कसोटीत उतरवण्याचा धोका स्वीकारणार नाही.
अर्थात, कन्कशनपेक्षा त्याची धोंडशिरेची दुखापत अधिक चिंतेची आहे, असे सूत्रांकडून समजते. भारत अ-ऑस्ट्रेलिया अ यांच्या लढतीदरम्यान समालोचकांनी जडेजा तीन आठवडय़ांसाठी बाहेर फेकला गेला असल्याचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार मात्र, जडेजा कन्कशनमधून पूर्ण सावरत असून येत्या काही दिवसात तो धोंडशिरेच्या दुखापतीतून देखील बाहेर पडलेला असणार आहे. भारताने विदेशातील कसोटी मालिकेत एकच फिरकीपटू खेळवला असेल तर अशा वेळी रविंद्र जडेजाला विशेष पसंती मिळत आली आहे.
आतापर्यंत खेळलेल्या 49 कसोटी सामन्यात जडेजाने 213 बळी घेतले तर 35.26 च्या सरासरीने 1 शतक व 14 अर्धशतकांसह 1869 धावा केल्या आहेत. जडेजा दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर त्याच्याऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला पसंती मिळू शकते. सराव सामन्यात डावखुऱया कुलदीप यादवपेक्षा अश्विनची गोलंदाजी अधिक सरस असल्याचे दिसून आले होते.









