विजय जाधव / गोडोली
जगभरात कोरानाचा कहर वाढत असून बाधितांना उपचारासाठी गैरसोय होते.सामाजिक बांधिलकीतून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यात संस्थेच्या महाविद्यालयात येत्या काही दिवसात 10 बेड असलेली तब्बल 38 रयत मदत केंद्रांची उभारणी करणार आहे.यात रूग्णांसाठी ऑक्सिजन,वैद्यकिय सुविद्या,उपचारासाठी योग्य मार्गदर्शनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध असणार आहे.याचा रयत सेवक,त्यांचे कुटूंबीय,विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ होणार असल्याची माहिती सचिव प्राचार्य डॉ.विट्ठलराव शिवणकर यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले.
कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची महती अलौकिक असून याच संस्थेकडून नेहमीच सामाजिक संकटात शक्य ती मदत करून बांधिलकी जोपासत योगदान दिले आहे.दुष्काळात अनेक गावांच्या ओढा खोलीकरण,गाळ काढून जल संधारणासाठी केलेले कार्य,पूरग्रस्तांसाठी केलेली मदत,कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्रीं सहाय्यता निधीला भरीव आर्थिक निधी देण्यात ही रयत सेवकांचे मोठे योगदान आहे.सध्या कोरोनाच्या महामारीत ही वाढत्या रूग्ण संख्येने शासकिय आणि खाजगी यंत्रणेवर उपचाराचा मोठा ताण येत आहे.तो थोडाफार कमी करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने राज्यात तब्बल 38 कोरोना रूग्णांसाठी रयत मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थेचे अघ्यक्ष शरद पवार,चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनातून संस्थेच्या मोठया महाविद्यालयात अशी केंद्र सुरू होणार असून परिसरातील रयत सेवक,त्यांच्या कुटूंबातील सदस्य,विद्यार्थ्याना या केंद्राची मदत होणार आहे.प्रत्येक केंद्रात ऑक्सिजन मशीन,प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था,रूग्ण वाहिकां,परिसरातील शासकिय,खाजगी रूग्णालयातील उपचारांची माहिती,वैद्यकिय मदतीसाठी तत्पर व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात येणार आहे.रयतचे माजी विद्यार्थी जे सध्या वैद्यकिय तज्ञ आहेत,त्यांचे मार्गदर्शन ही या मदत केंद्रांना मिळणार आहे.
सातारा जिल्हयात शरदचंद्र पवार महाविद्यालय,लोणंद,दहिवडी कॉलेज,डी.पी.भोसले कॉलेज,कोरेगाव,एसजीएम कॉलेज कराड,वायसी कॉलेज सातारा येथे ही मदत केंद्र लवकरच सुरू होणार आहेत.यासाठी सहसचिव प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड,संजय नागपूरे,ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलींग मेनकुदळे यांच्यासह रयत सेवका परिश्रम घेत आहेत.