प्रतिनिधी / विटा
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी माजी आमदार सदाशिव पाटील यांची निवड करणेत आली आहे. संस्थेच्या बैठकीत निवड झाली आहे. लोकनेते हणमंतराव पाटील यांच्यानंतर माजी आमदार पाटील यांना ही संधी मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार सदाशिव पाटील यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली. कर्मवीर अण्णांनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचा शाळा, हायस्कूल, महाविद्यालय इत्यादी माध्यमातून मोठा शाखा विस्तार आहे. विटा येथे बळवंत महाविद्यालयाचे उभारणी मध्ये स्व. लोकनेते हणमंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांनी आपली चार एकर जमीन बळवंत महाविद्यालयांस दान दिली होती. त्यांच्या हयातीपर्यंत ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात माजी आमदार सदाशिव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कूल आणि बळवंत महाविद्यालयांस विटा नगर परिषदेचे माध्यमातून आणि आमदारकीच्या कालावधीत नेहमी मदत केली होती.
आपल्या कामाची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. संस्थेच्या सर्व शाखांना नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, असे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.
Previous Articleराज्यात यापुढे एसएमएसद्वारे मिळणार निगेटिव्ह अहवाल
Next Article राज्यात यापुढे कोठेही लॉकडाऊन नाही









