प्रतिनिधी / पणजी
हिंगोली महाराष्ट्र येथील समृद्धी प्रकाशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय संत नामदेव बाल साहित्य पुरस्कार गोमंतकीय प्रसिद्ध कवी रमेश वंसकर यांच्या ’फुलराणी’ या बाल कविता संग्रहास जाहीर झाला आहे. तसेच सांगली येथील यशवंत माळी यांच्या ’माझी शाळा’ व नाशिक येथील सुभाष सबनीस यांच्या ’माऊची पिल्ले’ या बाल कविता संग्रहांचीही संत नामदेव बाल साहित्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे संस्थेचे प्रा. डॉ. श्रीराम कान्हाळे यांनी कळविले आहे.
गोव्यात मराठी बाल कविता लिहिणाऱया रमेश वंसकर यांचा फुलराणी हा बारावा बाळ कविता संग्रह आहे. या संग्रहाचे उस्मानाबाद येथे जानेवारीमध्ये भरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. वंसकर यांना यापूर्वी गोवा हिंदू असोसिएशचा कविवर्य पद्मश्री बा.भ. बोरकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे गोमंत विद्या निकेतन,मडगाव आणि गोवा व महाराष्ट्रातील अन्य संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांची विविध विषयांवरील अन्य दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वंसकर हे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष आहेत.









