काणकोण मतदारसंघात दुसऱयांदा मिळविलेला विजय, नगरपालिका क्षेत्रात तसेच तीन पंचायतींत आघाडी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातून विजय प्राप्त केलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व माजी मंत्री रमेश तवडकर यांचे काणकोणातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. गुळे येथील श्री भूमिपुरुष देवालयाजवळ असंख्य कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर तवडकर यांनी प्रथम श्री भूमिपुरुष देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, महिला मोर्चा अध्यक्षा, अन्य पदाधिकारी, भाजपाच्या मंडळ समितीचे अन्य पदाधिकारी, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, अन्य नगरसेवक, विविध पंचायतींचे पंच आणि कार्यकर्ते होते. गुळे येथील श्री भूमिपुरुष देवालय ते श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवालयापर्यंत काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काणकोण मतदारसंघातून दुसऱयांदा विजय
भाजपतर्फे काणकोण मतदारसंघातून तवडकर दुसऱयांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी दोन वेळा ते पैंगीण मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी तवडकर यांनी काणकोण नगरपालिका क्षेत्र, पैंगीण, खोतीगाव आणि गावडोंगरी पंचायतींमध्ये आघाडी घेतली. काँगेसच्या जनार्दन भंडारी यांनी आगोंद पंचायतीमध्ये आणि अपक्ष उमेदवार विजय पै खोत यांनी श्रीस्थळ पंचायतीमध्ये आघाडी घेतली, तर अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस लोलये पंचायत वगळता अन्य कोणत्याही पंचायतीमध्ये आघाडी घेऊ शकले नाहीत.
खोतीगाव, गावडोंगरीत तवडकरांना साथ
यापूर्वी फर्नांडिस यांनी नेहमीच गावडोंगरी आणि खोतीगाव या दोन्ही पंचायतीमध्ये आघाडी घेतलेली आहे. मात्र यावेळी बहुसंख्य आदिवासी समाज असलेल्या या पंचायतींमधील मतदारांनी त्यांना बाजूला करतानाच तवडकर यांच्या बाजूने मतदान केले. विशेष म्हणजे ज्या मार्ली वाडय़ावरील रस्ता तयार करण्यासाठी फर्नांडिस यांनी विशेष प्रयत्न केले होते त्या वाडय़ावर देखील ते आघाडी घेऊ शकले नाहीत. लोलये पंचायतीमध्ये नेहमीच फर्नांडिस सर्वाधिक मते घ्यायचे. त्या पंचायतीमध्ये यावेळी त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.
फर्नांडिस यांना पैंगीण पंचायतीमध्ये केवळ 616 इतकी मते मिळाली. या पंचायतीमध्ये जनार्दन भंडारी या काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराने 1252 इतकी मते मिळविली. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर विकासाची कारणे पुढे करून फर्नांडिस यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी त्यांना जशी अद्दल घडविली त्याचप्रमाणे 2017 च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी न दिलेल्या तवडकर यांना यावेळी काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांनी न्याय दिला. कधी नव्हे एवढा आदिवासी समाज यावेळी संघटित झाला आणि तवडकर यांच्या बाजूने राहिला.
पै खोत यांना धक्का
या निवडणुकीत विजय पै खोत यांना सपशेल हार पत्करावी लागली असून त्यांना अनपेक्षित असे मतदान झालेले आहे. यावेळी आपणच निवडून येणार या आत्मविश्वासाने त्यांनी तयारी केली होती. पण मतदारांनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. त्यामानाने काँग्रेसच्या भंडारी यांची कामगिरी महत्त्वपूर्ण अशी असून या मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. आरजी आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार नसते, तर भंडारी या मतदारसंघात किमया करू शकले असते आणि फर्नांडिस व पै खोत यापैकी कोणा एकाने नमते घेतले असते, तर या मतदारसंघात वेगळाच निकाल पाहायला मिळाला असता, अशा प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या.









