ऑनलाईन टीम / पुणे :
खोलात जाऊन विचार केल्यास या देशांत होऊन गेलेल्या बहुतेक सर्व महान व्यक्ती घडण्यामागे स्त्रीशक्ती खंबीरपणे उभी असल्याचे आपणास आढळून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे देखील रमामाई उभ्या राहिल्या म्हणून बाबासाहेब घडले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले.
महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती आणि आडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त आयोजित रमाई महोत्सवात आज रमाईरत्न पुरस्कारांचे वितरण संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ठाले-पाटील बोलत होते. सहकार क्षेत्रातील तज्ञ विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जैनब बागवे यांना रमाईरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना ठाले-पाटील म्हणाले, बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. बडोद्याच्या सयाजीराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली म्हणून ते इंग्लंडला जाऊन शिकू शकले. पंरतू, शिष्यवृत्तीरुपी येणारा अधिकतर पैसा पुस्तक खरेदीत खर्च होत असल्याने त्यांना तो पुरत नव्हता. बाबासाहेबांनी रमामाई यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करुन दिली असता, गौऱया थापून संसाराचा गाडा ओढणाऱया रमामाईने त्यातूनही पैसे वाचवत प्रसंगी स्वतःच्या, पोरांच्या पोटाला चिमटा काढत बाबासाहेबांना पैसे पाठविले. पैश्यांच्या या चणचणीमुळे आणि सततच्या ओढाताणीमुळे रमामाई त्यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला तो आजारी असतांना उपचार देऊ शकल्या नाही आणि त्यात तो दगावला. मुलाची ही हानी बाबसाहेबांना खूप मोठे दुःख देऊन गेली.
बाबासाहेब आणि रमामाई यांच्या सहजीवनाचा काळ देखील तसा अल्पच होता. रमामाई बाबसाहेबांच्या आयुष्यातून खूप लवकर निर्वतल्या. रमामाई निवर्तल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःला एका खोलीत चार दिवस कोंडून घेत आक्रोश, दुःख केले होते. सत्ता आणि सेवा एकाच घरात नांदतांनाची फार कमी उदाहरणे आहेत. आजचे पुरस्कारार्थी मात्र त्यास अपवाद आहेत. सध्या सगळीकडे सत्तेसाठी स्पर्धा सुरु असतांना सेवेसाठी कोणी पुढे येतांना दिसत नाही, सत्तेसाठीची चाललेली स्पर्धा सेवेसाठी दिसून येत नाही.