प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील दोघांना न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या आरोपींवर संपूर्ण महाराष्ट्रात 55 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (31) आणि नरसिंग दशरथ कारभारी (30, दोन्ही रा. दहिसर मुंबई) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्याविरोधात दिपक पांडूरंग गद्रे (रा. पावरहाउस समोर नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानूसार, 13 ऑक्टोबर 2018 रोजी निशांत परमारने गद्रे यांना फोन करुन मी मुंबईतून बोलतोय असे सांगत तुम्ही एकाला चोरटे पिस्तुल घेण्यास सांगितले होते.तो माझ्या ताब्यात असून हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हांला 25 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून गद्रे यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दिपक गद्रे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती.
याप्रकरणी तपास करताना ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करुन त्यांच्याविरोधात भादंवी कलम 170, 384, 419, 468, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी निकाल देताना बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी इटकळकर यांनी आरोपींना 2 वर्ष 6 महिने साधी कैद आणि 1 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. एस.एस.वाधवणे,अॅड.इम्रान मुजावर आणि अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. तसेच तपासिक अंमदलार म्हणून ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम, पोलिस नाईक अमित कदम, हेड काँस्टेबल दिडपिसे, पोलिस नाईक विलास जाधव यांनी तर पैरवि अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार अनंत जाधव आणि मदतनीस म्हणून महिला पोलिस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.