ई महाभूमिच्या राज्य समन्वयकांच्या बदलीची मागणी
बदली न झाल्यास संपूर्ण कामकाजावर बहिष्कार यांचा इशारा
कणकवली / प्रतिनिधी:
राज्य तलाठी महासंघाच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजबाबत ईमहाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी अपशब्द काढल्याने तलाठी व मंडळ अधिकारी संतप्त झाले आहेत. तसेच ईमहाभूमी प्रकल्पांमध्ये चुकीच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यामुळे तलाठी व सर्व शेतकरी बांधवांना नाहक त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने राज्य समन्वयकांची बदली करावी, अन्यथा संगणकीय कामकाज बंद करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या कणकवली शाखेच्यावतीने देण्यात आला. तसेच येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ कणकवलीच्या वतीने सोमवारी निदर्शने करतानाच ही बदली न झाल्यास 12 ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्याकडे डीएससी जमा करण्यात येईल. तसेच मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना आंदोलनाबाबत निवेदन देण्यात येऊन 13 ऑक्टोबर पासून सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. तलाठी मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी तसेच महसुली उत्पन्नात वाढ करणे राज्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही करत असताना महसूल लेखे संगणकीकरण करणे सातबारा व ईफेरफार, ईचावडी अशा विविध योजना तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी प्रसंगी स्वखर्चाने व रात्रंदिवस काम करून पूर्णत्वास नेल्या आहेत. असे असताना नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राज्य समन्वय यांच्याकडून होत आहे. संगणकीकृत प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शासनाच्या लोकाभिमुख योजनेवर होत आहे. वेळोवेळी याबाबत चर्चा होऊनही त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे बदल न होता नवनवीन प्रकल्प तलाठी व मंडळ अधिकारी यांना विचारात न घेता, पायाभूत सुविधा न देता लादले जात आहेत. त्यामुळे तलाठी संवर्गास कामाच्या ताणामुळे तसेच जनतेच्या कामाची पूर्तता करू न शकल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे संबंधित राज्य समन्वयक यांची तातडीने बदली करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण कामकाजवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे उपाध्यक्ष शामसुंदर जाधव, सल्लागार दिलीप पाटील, तालुका अध्यक्ष गणेश गोडे व इतर मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते.









