प्रतिनिधी/ चिपळूण
केंद्र शासनाकडून आलेल्या आदेशानुसार 31 खनिजे गौण खनिज म्हणून अधिसूचित केलेल्या गौण खनिजांना परवाने देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे कोकणात घरबांधणीसाठी अत्यावश्यक चिरा/जांभा दगड (लॅटराईट स्टोन) खाणींना परवानगी देणे बंद झाले होते. मात्र आमदार शेखर निकम यांनी गेले महिनाभर सर्वांच्या सहकार्याने पाठपुरावा केल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात जांभा/चिरेखाणींना परवानगी देण्याचा आदेश मंगळवारी महसूल विभागाकडून देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून गौण खनिजांना परवाने देणे बंद करण्यात आले असल्याने त्याचा परिणाम कोकणात घरबांधणीवर झाला होता. यासंदर्भात कोकणातील सर्वच आमदारांनी चिरा/जांभा दगड (लॅटराईट स्टोन) खाणींना पूर्वीप्रमाणे अल्पमुदतीचे परवाने द्यावेत यासाठी पाठपुरावा केल्याने यात मोठे यश आले आहे. आमदार निकम यांनी यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. या सर्वानी कोकणातील ही अडचण लक्षात घेऊन परवाने देण्यास अनुकुलता दर्शवत तसे आदेश मंगळवारी पारीत केले असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
दरम्यान, चिरेखाणीतील या दगडाचा वापर औद्योगिक प्रयोजनार्थ होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना चिरेखाणींना परवानगी देताना महसूल विभागाकडून करण्यात आली आहे.









