राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष ?
प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खाडी परिसरात गेले अनेक दिवस सक्शन पंपाच्या साह्याने वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे मात्र प्रशासनाचे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. या वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे तर काही दिवसांपूर्वी सबंधितावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपानंतर या कारवाईवर पडदा टाकल्याचे समजते.
सध्या कोरोनाचा काळ असल्याने याचा गैरफायदा घेत बंदी असूनही अनेक वाळू माफिया खाडी परिसरात सक्शन पपंच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. करजुवे परिसरात काही वाळू व्यवसाईकवर कारवाई करून हा व्यवसाय बंद करण्यात आला. मात्र काही व्यवसायिक आपल्या राजकीय शक्तीचा फायदा घेत बिनधास्तपणे वाळूउपसा करत आहेत. प्रशासनही या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे.
पेढांबे खाडी परिसरात गेले अनेक दिवस रात्रीच्या वेळी सक्शन पपंच्या साह्याने राजरोसपणे वाळू उपसा केला जात आहे. मात्र प्रशासनाच्या या भागातील संबंधित अधिकारी वर्गाला यांची कल्पना नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू उपसावर बंदी आल्याने बांधकामाची कामे करणे सर्वसामान्यांना कठीण होऊन बसले आहे. यासाठी ही बंदी उठवण्याची मागणी सर्वसमान्यांकडून केली जात आहे.