प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यात आज पहाटे पासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आले होते. अशाही स्थितीत संगमेश्वरच्या महावितरण विभागाने सतर्कता दाखवत ज्या भागात शक्य होते त्या भागातील वीज पूरवठा सकाळी ९ : १५ पर्यंत सुरळीत ठेवला होता. यानंतर पूराच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर वीज प्रवाह सुरक्षेसाठी बंद करावा लागला.
दिवसभर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सायंकाळ पर्यंत वीज पुरवठा कोठे कोठे सुरळीत करणे शक्य आहे यासाठी प्रयत्नशिल होते. सायंकाळी ५ : ३० वा. वाशी फिडर सुरु करायचा होता. मात्र लोवले येथील महावितरणची डीपी पूर्णत: पाण्याखाली असल्याने तेथील फ्यूज काढणे आवश्यक होते. अशावेळी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून लाईनमन अक्षय घाटकर यानी पूराच्या पाण्यातून पोहत जात फ्यूज काढण्याचे धाडस दाखवले. यामुळे वाशी फिडर सुरु होवून अन्य गावांचा वीज प्रवाह सुरु होवू शकला. लाईनमन अक्षय घाटकर आणि त्याला सहकार्य करणारे सहकारी विक्रांत भोसले , अंकेश गेल्ये यांना , त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.