1 जुलै ते 15 ऑगस्ट अभ्यासक्रमाचा कालावधी, कोरोना काळातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न
शाळा, शिक्षकांसमोरील प्रश्नांना शिक्षण विभागाची बगल, `ऑनलाईन’साठी पुरक नसलेली रचना हाताळताना गुरुजींची दमछाक
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाने शाळा बंद आहेत. तरीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी शिक्षण विभागाची धडपड सुरु आहे. विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शैक्षणिक नुकसान `सेतू अभ्यासक्रम’ (ब्रीज कोर्स) च्या माध्यमातून भरुन काढले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र शाळा सुरु झाल्यावर प्रत्यक्ष वर्गात करण्यासाठीचा कृती कार्यक्रम घाईघाईने ऑनलाईन राबवण्याचा अट्टाहास शिक्षण विभाग करत असल्याने शाळांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
गतवर्षी 2020 चे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या प्रसारात व्यापून गेले. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शाळा सुरु झाल्या. पण त्यासमोरही पुन्हा वाढत्या कोरोना फैलावामुळे `ब्रेक’ लागला. यावर्षी 2021 या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभालाही कोरोनाने रोखून धरलेय. शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरु झालेय…पण त्यासमोरही अनंत अडचणी उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नवीन वर्गात जाताना त्यांचे गतवर्षीचे शैक्षणिक नुकसान सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भरून काढण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून याची सुरुवात गुरुवार 1 जुलैपासून झाली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्हÎातील सर्व शिक्षकांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून याची कार्यवाही सुरु झाली आहे.
पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षीच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम मदत करणार आहे. दुसरी ते दहावी पर्यंतच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. खासगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित या सर्व शाळांना तो बंधनकारक करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमामागील संकल्पना स्वागतार्ह असली तरीही त्याची मांडणी, विशेत: भाषा विषयांची, प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाला पुरक असल्याचे शिक्षकांना वाटते. यामध्ये विद्यार्थ्यांचे पेअर वर्क वा ग्रुप वर्क स्वरुपातील गटकार्य, वर्गासमोर प्रत्यक्ष सादरीकरण आदींचा समावेश आहे. त्यामुळे हा `सेतू’ ऑनलाईन घेताना शिक्षकांची कसरत होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र पुस्तिकांची निर्मिती करण्यात न आल्यानेही काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या अभ्यासक्रमात दर 15 दिवसांनी 3 चाचण्या घेण्याचेही नियोजन आहे. शाळा बंद असताना या चाचण्या कशा घ्यायच्या, याबाबतही तोंड उघडण्यास शिक्षण विभाग तयार नाही. शंका न विचारता काम सुरु करा व अहवाल पाठवा, जिल्हा अग्रभागी राहिला पाहिजे. एवढेच उद्दिष्ट सध्या अधिकाऱयांनी ठेवल्याची चर्चा आहे. या काही अंमलबजावणी स्तरावरील समस्यांबरोबरच काही संभ्रमही निर्माण झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी 45 दिवसांचा कालावधी वापरल्यानंतर उर्वरित वेळेत यावर्षीचे कामकाज कसे पूर्ण करायचे, विशेत: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय, यासारख्या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी शिक्षण विभागाकडे नाहीत. विचारणा केली असता `अधिकारां’चा वापर करुन गप्प केले जात असल्याचा अनुभव काहीजणांनी सांगितला आहे.
दररोज किती वेळ `स्क्रीन टाईम’ असावा, या बाबतही शासनाने निर्देश दिले आहेत. यामुळे `सेतू’, दिक्षा आदी उपक्रमांसह सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम, त्यातच शिक्षण विभागाचे उत्साही अधिकारी, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संघटना यांनी तळमळीने आयोजित केलेले वेबिनार, मार्गदर्शन सत्रे यासाठीही विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे फतवे निघत आहेत. या गदारोळात शिक्षकांनी अध्यापनाचे काम केव्हा करायचे, असा प्रश्न शाळांसमोर उभा आहे. या साऱया भडीमारासमोर बिचारा विद्यार्थी हतबल आणि पालकही अस्वस्थ आहेत. यातून शाळा व पालकांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचवेळी शाळा-शिक्षकांच्या समस्यांवर मंथन करण्याऐवजी शिक्षण विभाग मात्र अहवाल, आकडेवारी यातच धन्यता मानत असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
असा आहे अभ्यासक्रमः
अभ्यासक्रमात दिवसनिहाय देण्यात आल्यात कृतीपत्रिका.
कृतीपत्रिका विद्यार्थी, कृतीकेंद्रीत, व अध्ययन निष्पती आधारित.
स्वयंअध्ययन करु शकतील, असे त्यांचे स्वरुप आहे.
त्या-त्या दिवसांची कृतीपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात.
शिक्षक, पालक, शिक्षकमित्र, स्वयंसेवक व विद्यार्थीमित्रांची घ्यावी मदत.
अभ्याक्रमात ठराविक कालावधीनंतर दिलेल्या 3 चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडवणे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन, ऑफलाईन सोडवून घ्याव्यात.
चाचण्या तपासणे व त्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवावी.
हे आहेत प्रश्न:
अभ्यासक्रमाची मांडणी ऑफलाईनसाठी की ऑनलाईनसाठी पुरक आहे?
वर्षाची सुरुवात 15 ऑगस्टनंतर झाल्यास या वर्षाच्या अभ्यासक्रमाचे काय?
इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र पुस्तिका नसल्याने येणाऱया अडचणींचे काय? ( जिल्ह्यात अनेक शाळा सेमी इंग्लिश आहेत)
संस्कृत विषयाचा यामध्ये अंतर्भावच नाही, या विषयाच्या भरपाईचे काय?
नेटवर्क अधवा परिस्थितीमुळे वंचित राहणाऱया मुलाच्या नुकसानीची भरपाई कशी होणार?
काही विषयांच्या पुस्तिकेत अपेक्षित केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या देहबोलीचे-हावभावांचे निरीक्षण ऑनलाईन कसे करणार?
मोठ्या प्रमाणात शिक्षक दीर्घ काळासाठी आपत्कालीन सेवेकडे वर्ग केले जात असताना `सेतू’ची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत का?
दररोज 5-6 विषयांबाबत ऑनलाईन काम करायचे झाल्यास शासनाच्याच क्रीन टाईमबाबतच्या वेळेच्या बंधनाचा निकष कसा पाळणार?









