प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला मंजुरी अद्याप मिळाली नसल्याचा खुलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते म्हणाले की, पूर्वीपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. अधिकाऱयांनी अर्धवट माहिती देऊन संभ्रम निर्माण करू नये. सर्व ग्रामपंचायतीत जाऊन या संदर्भात सर्वप्रथम अधिकाऱयांनी जनजागृती करावी. सर्वांना विश्वासात घेऊनच हा निर्णय होणार आहे. अजूनही शासनाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, असा खुलासा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत शहर हद्दवाढ प्रक्रिया सुरू झाली असून हरकती मागवण्यात येत असल्याची माहिती दिली होती. शासनाकडून आलेल्या आदेशानुसारच ही अंमलबजावणी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तर दुसरीकडे शासनाकडून अद्यापही कोणतीही परवानगी मिळाली नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे तरी अधिकाऱयांनी चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊ नये, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीची आहे का, असा सवाल आता नागरिकांमधून व्यक्त केली आहे.









