प्रतिनिधी/ रत्नागिरी
यापुढे शीळमधून वारंवार होणारी पाणी गळती पूर्णपणे बंद होणार आहे. नव्या जलवाहिनीची चाचणी 100 टक्के पूर्ण झाली आहे. येत्या 2 दिवसात शहरातील पाणीटंचाई पूर्णपणे मार्गी लागणार असून संपूर्ण शहरच टँकरमुक्त होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नव्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ कधी होणार, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. मात्र कोरोनामुळे काही दिवस या ठिकाणी काम बंद होते. आता हे काम सुरू असून नगर परिषदेनी घेतलेल्या मेहनतीमुळे ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी केलेले विशेष प्रयत्न आणि प्राधिकरणच्या सहकार्यामुळे मुख्य जलवाहिनीची चाचणी ही यशस्वीपणे पार पडली. यामध्ये एकाच ठिकाणी लिकेज आढळून आले. त्यामुळे सोमवारी, मंगळवारी शहराला पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
संपूर्ण शहर टँकरमुक्त होणार: सामंत
ज्या पद्धतीने आज कोकणनगर टँकरमुक्त करण्यात यशस्वी झालो आहोत. त्याप्रमाणे संपूर्ण शहर टँकरमुक्त होणार आहे. यापूर्वी जुन्या पाईपलाईनमध्ये 58 टक्के लिकेज होते. त्यामुळे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. ही माहिती या कामादरम्यान समोर आली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेत एकही लिकेज नसणार. त्यामुळेच ही चाचणी करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, मुख्याधिकारी ठोंबरे, पाणी सभापती विकास पाटील, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, निमेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘त्यांनी’ दिलेला शब्द केला पूर्ण
शहरातील पाणी टंचाईचे संकट आता कायमचे दूर होणार आहे. सुधारित पाणी पुरवठा योजनेमधील शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार फुटत होती. सुमारे 58 टक्के गळती होती. त्यामुळे शहराला अपेक्षित पाणी पुरवठा होत नव्हता. नागरिकांची ओरड होती. म्हणून नवीन मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. या कामात अनेक अडचणी आल्या. मात्र मंत्री उदय सामंत व नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. लॉकडाऊनमुळे 60 दिवस काम बंद होते. परंतु साळवी यांनी दिवस-रात्र एक करून हे काम पूर्ण करून घेतले.
उद्घाटन वैगेरे न करता आधी पाणी सोडणार
शीळ नवीन जलवाहिनीचा शुभारंभ हा कोणतेही उद्घाटन न करता होणार आहे. आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे एक-दोन दिवसात उद्घाटन वैगैरे न करता आधी पाणी सोडले जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.









