आमदार योगेश कदम यांचे स्पष्टीकरण
जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही
प्रतिनिधी / खेड
घटनेने दिलेला अधिकार कुणी डावलण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो मतदारांचा पर्यायाने जनतेचा अवमान आहे. याविरूद्ध लढण्याचा माझा हवकच आहे. त्यासाठीच खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग ठराव असल्याचे दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, खासदार सुनील तटकरे हे महाविकास आघाडीचे नेते असून त्यांचा सदैव आदरच केलेला आहे. त्यांचे जेष्ठत्व व अनुभव आमच्यासाठी मार्गदर्शक असून दापोली मतदारसंघात त्यांनी जनतेच्या विकासासाठी कुठेही बोलवावे मी हजर राहिन. पण ज्यांनी जनतेला खोटी आश्वासने देवून खोटे श्रीफळ वाढवणान्यांच्या हातात जनतेने नारळ दिला आहे. त्यांनी माझ्या हक्कभंगाला भंपकपणा म्हणावे याचे आश्चर्य वाटते. मतदारसंघातील जनतेने त्यांच्या भंपकपणाची योग्य दखल घेतलेली आहे.
गेली पाच वर्षे खोटी आश्वासने मिळाल्याने व वारंवार मागणी करूनही त्याचा विकास न झाल्यामुळे जनता माझ्याकडे विश्वासाने पहात असेल व गैरसमजासह दिशाभूल झाल्याने अन्यत्र गेलेले शिवसैनिक स्वगृही परतण्याची इच्छा प्रकट करत असतील तर अशा शिवसैनिकांचे यतोचित स्वागत करणे हे माझे कर्तत्व समजतो. त्यामुळे महाविकास आघाडीत गैरसमज होण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे लोकाभिमुक सरकार असून उत्तम काम चालले आहे. हे सरकार ५ वर्षे भक्कमपणे काम करेल हा राज्यातील जनतेला ठाम विश्वास आहे. या विश्वासाला कदापीही तडा जावू देणार नसल्याचे आमदार कदम यांनी शेवटी सांगितले.









