राजापूर / वार्ताहर
जनतेच्या सेवेशी निगडित असलेल्या राजापूर पंचायत समितीच्या तब्बल विभागांचा कारभार प्रभारींच्या हातून हाकलला जात आहे. यामध्ये सहाय्यक गटविकास अधिकाऱयांसह, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, पशुवैद्यकीय या विभागांचा समावेश आहे. पशासकीय कारभार गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असताना रिक्त असलेल्या पदांमुळे शासनाच्या या उद्देशाला खीळ बसत आहे.
संपूर्ण तालुक्याचा प्रशासकीय कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून हाकलला जातो. प्रशासकीय कारभारामध्ये सुसूत्रता आणि गतिमानता यावी या उद्देशाने पंचायत समितीच्या कारभाराचे विविध विभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा, आरोग्य, कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुवैद्यकीय अशा विभागांचा समावेश आहे. या पैकी तब्बल पाच कार्यालयांचा कारभार प्रभारींच्या मार्फत हाकलला जात आहे. यामध्ये पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद रिक्त असून त्याचा कार्यभार पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी सुशांत एकल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तसेच भावी पिढी घडविणाऱया शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी पदही रिक्त असून त्याचा कार्यभार अशोक सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागातील पशुवैद्यकीय अधाकारी हे पदही मागील अनेक वर्षे रिक्त आहे. टंचाईग्रस्त तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेला पाणीपुरवठा विभागालाही प्रभारींचे ग्रहण लागलेले आहे. तर एकात्मिक महिला व बालकल्याण विभागातील पकल्प अधिकारी पद रिक्त असल्याने या विभागाचा कारभार मुख्य सेविकांमार्पत हाकला जात आहे.
राजापूर पंचायत समितीच्या या विभागातील पमुख अधिकाऱयांची पदे मागील काही वर्षांपासून रिक्त असताना ती भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने लोकाभिमुख प्रशासकीय कारभार करण्याच्या शासनाच्या उद्देशाला खीळ बसत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी तालुक्यातून होत आहे.









