प्रतिनिधी/रत्नागिरी
संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी ही संस्था गेली तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहे. जातीधर्म न पाहता केवळ माणूसकी जपण्यासाठी एनजीओ चे हे शिलेदार अहोरात्र गोरगरिबांसाठी विनामूल्य काम करीत आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील निधन झालेल्या खेड येथील व्यक्तीचे अंत्यसंस्कार युनिक संकल्प फाऊंडेशनच्या मदत कर्त्यानी केले.
सामाजिक सहकार्याच्या भावनेतून मयत होणाऱ्या व्यक्तींची दफन व अंत्यसंस्कार पर्यंत ची सर्व व्यवस्था हे फाऊंडेशन करीत असते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात खेड येथील प्रभाकर वाघ हे सोमवारी रात्रौ मयत झाले. सोबत त्यांचा 15 वर्षांचा मुलगा आणि आई होती. पेशंट इतर रोगाने त्रस्त होते. कोरोना निगेटिव्ह होता. यावेळी त्याचे कुटुंबीयांनी सांगितले की, तेथेच अंत्यसंस्कार करा. रात्रभर कोणीच नातेवाइक नसल्याने ते दोघे हतबल झाले होते.
संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी लगेच ही बाब एनजीओ चे युवा अध्यक्ष राजू भाटलेकर यांना सांगितली. राजू भाटलेकर यांना सोबत घेवून सर्व शासकीय फॉरमॅलिटी पूर्ण केली. रत्नागिरी येथील पांढरा समुद्र स्मशानभूमीत दिलावर कोंडकरी, शकील गवाणकर, ईस्माइल नाकाडे सयीद मुल्ला, युसुफ शिरगावकर, यांनी आपल्या खांद्यावरून हे प्रेत स्मशानभूमीत नेले आणि अंत्यसंस्कार केले. या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी केलेले कार्य आदर्श देणारे आहे. या वेळी राजू भाटलेकर व उमेश कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.









