मुदत संपायला फक्त 2 महिने बाकी… काम केवळ 15 टक्केच
रखडलेल्या कामाबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिला होता इशारा
तरीही ठेकेदाराकडून बांधकाम प्रगतीकडे कानाडोळा
प्रतिनिधी / रत्नागिरी
आघाडी सरकारच्या कारकिर्दीत सन 2018 मध्ये बीओटी तत्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) रत्नागिरी बसस्थानक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सत्ता बदलानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात येऊन रत्नागिरी बसस्थानकाची ‘जी प्लस टू’ अशी नवीन इमारत बांधण्यासाठी भूमिपूजन झाल्यानंतर पत्यक्ष बांधकामाची कार्यवाही देखील सुरू झाली. पण या कामाची मुदत संपायला अवघे दोन महिने शिल्लक असताना केवळ 15 टक्के झालेले काम पाहता पुरता बोजवारा उडालेला आहे.
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या 17 कोटींच्या प्रस्तावाला त्यावेळी मंजूरी मिळाली होती. या कामाचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, सत्तांतरानंतर परिवहन मंत्रीपद दिवाकर रावते यांना मिळाले. त्यांनी रत्नागिरी बसस्थानकाचा बीओटी तत्वावरील प्रस्तावच रद्द केला. त्यांनी शासनाच्या माध्यमातून बसस्थानक बांधण्याचे निश्चित केले. एकाचवेळी त्यांनी राज्यातील काही बसस्थानकांना मंजुरी दिली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक, लांजा बसस्थानक, चिपळूण बसस्थानकाला मान्यता मिळाली. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी दहा कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. आराखडा निश्चितीनंतर तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आराखड्यात काही बदल सूचवले होते.
त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी बसस्थानकाची ‘जी प्लस टू’ अशी नवीन इमारत होणार असून, त्यात व्यापारी गाळ्यांसह आरामदायी आसनव्यवस्था, प्लॅटफॉर्मसह चालक, वाहक, अधिकाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष व प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मात्र लॉकडाऊनकाळात या बसस्थानकाचे काम रेंगाळलेलेच राहिले. इमारतीच्या बांधकामासाठी खोदाई व काही प्रमाणात पाया फाऊंडेशन टाकण्याचे काम झालेले आहे. त्या व्यतिरिक्त कोणतेही काम अद्यापही सुरू नाही. अशा या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामाची मुदत येत्या 23 जानेवारी 2021 ला मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या कामाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र उभे आहे.
रत्नागिरी बसस्थानकाच्या काम करणारे कामगार माघारी परतल्याने हे काम रेंगाळलेले आहे. मात्र हे काम तात्काळ सुरू करण्याचे पत्र एसटी परिवहन विभागाकडून संबधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहे. येत्या मंगळवारपासून काम करणारे कामगार परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकाचे थांबलेले काम पुन्हा सुरू होईल.
सुनील भोकरे, विभाग नियंत्रक – रत्नागिरी
महिनाभरात प्रगती न दिसल्यास कारवाई करण्याचा दिला होता इशारा
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मागील काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्या कामासाठी योग्य नियोजन करावे, महिना, दीड महिन्यात कामाबाबत प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा सामंत यांनी जिल्हाधिकारी, अन्य अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी करून ठेकेदाराला दिला होता. रत्नागिरी एस. टी. बस स्थानकाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रेंगाळलेल्या बसस्थानकाच्या कामाबाबत प्रवासी व जनतेतून वारंवार तक्रारी येत असल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बसस्थानकाच्या कामाची पाहणी मागील जानेवारी 2020 मध्ये केली होती. त्यावेळी संबधित ठेकेदाराला कडक समज देण्यात आली होती.









