मोजणी करण्यासाठी आलेल्यांना पाठवले माघारी
प्रतिनिधी / संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी संगमेश्वर आणि माभळे येथे आज नव्याने केल्या जाणाऱ्या वाढीव भूसंपादनास व्यापारी वर्गाने तीव्र स्वरुपाचा विरोध करुन आपले सविस्तर निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर केले. व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
व्यापारी बांधवांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणी माणूस नेहमीच शासनाला सहकार्य करीत आला आहे. कोकण रेल्वेचा प्रकल्प असो अथवा मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण असो संगमेश्वरवासीयांनी आणि येथील स्थानिक व्यापारी बांधवांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी विनातक्रार देवून विकास कामामध्ये आपला हातभार लावला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संगमेश्वर येथे प्रथम जेवढी जमीन आवश्यक होती, तेवढी येथील व्यापारी बांधवांनी स्वतःची गैरसोय होत असतानाही कोणताही विरोध न करता दिली होती. संगमेश्वर ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून एक ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. याचबरोबर संगमेश्वर हे एक प्राचिन स्थळांचे पर्यटनस्थळ म्हणून देखील ओळखले जाते.
अशा स्थितीत राष्ट्रीय महामार्ग विभाग आता नव्याने वाढीव भूसंपादन करण्याचा प्रयत्न करत असून या वाढीव भूसंपादनामुळे संगमेश्वर येथील छोटे मोठे व्यापारी आणि येथील प्राचीन महत्व असलेली बाजारपेठच उध्वस्त होणार आहे. संगमेश्वरमध्ये भौगोलिक दृष्टीने विस्तारण्यास कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने येथील व्यापारी अन्य जागेत स्थलांतरित होवू शकत नाही. सद्यस्थितीत व्यापारी वर्गाकडे असलेली नाममात्र जागा उपयोगात आणून सध्या कसातरी व्यापार सुरु आहे. कोविड१९ च्या काळात व्यापारी, हातावरील पोट असलेला कामगार उध्वस्त झालेला असताना संगमेश्वर येथे वाढीव भूसंपादनाचा घाट घालून आम्हांला आयुष्यातूनच उठविण्याचा हा प्रकार आहे. सबब कोणत्याही परिस्थितीत हे वाढीव भूसंपादन केले जावू नये. अन्यथा आम्हाला प्राणांतिक उपोषण सुरु करुन कडवा विरोध करावा लागेल याची आपण नोंद घ्यावी आणि वाढीव भूसंपादन प्रक्रिया तातडीने थांबवावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. याबाबत माभळे येथील व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी आपले स्वतंत्र निवेदन सादर केले. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि पोलीस यावेळी उपस्थित होते.









