वार्ताहर / मौजेदापोली
मिनिमहाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढली असून हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक यामुळे चांगलाच सुखावला आहे.
शनिवार, रविवार सलग सुट्ट्या लागून आल्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणाहून पर्यटकांची गर्दी झाली आहे. मात्र या शनिवार-रविवारमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबासह पर्यटक आल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.
कोरोनाच्या कालावधीत व त्या आदी तोट्यात गेलेला हॉटेल व्यवसाय आता सावरण्यास सुरूवात झाली आहे. तर रात्रीच्या निळ्या लाटांची देखील अनेकांना भूरळ पडली आहे. या लाटा रात्रीच्या प्रकाशात पाहण्यास त्या खूप चांगल्या वाटत असल्यामुळे अनेकजण रात्रीच्या सुमारास समुद्र गाठत आहेत. काही दिवसांपूर्वी समुद्राच्या लाटा हिरव्या दिसत होत्या. तर आता निळ्या दिसत आहेत. हे पाहण्यासाठी अनेकांनी समुद्रकिनारे गाठले होते. या लाटा पर्यटकांसह स्थानिकांना देखील आकर्षित करत आहे. दापोलीतील मुरूड, कर्दे, हर्णै, पाळंदे, आंजर्ले, केळशी, लाडघर आदी ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सलग सुट्ट्या येत असल्यामुळे अधिकाधिक पर्यटकांनी दापोली गाठली आहे.









