मोबदला घेवूनही इमारती तोडण्यास दिरंगाई
दीपावलीनंतर अतिक्रमणांवर फिरणार बुलडोझर
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात खोडा पडला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कामाला पुन्हा गती दिली आहे. मात्र, भरणे परिसरातील चौपदरीकरण कामात अतिक्रमणांचा अडसर निर्माण झाला आहे. दोन वर्षापूर्वी जमिन मालकाना भू-संपादनातील जागेचा मोबदला घेवूनदेखील इमारती तोडण्यास दिरंगाईच केली जात असल्याने चौपदरीकरण कामात खोडा पडला आहे. चौपदरीकरणात संपादित जागांवरील इमारतींवर दीपावलीनंतर बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ किमी. अंतरापर्यंतच्या चौपदरीकरणापैकी ३८ किमी. अंतरापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. या चौपदरीकरणावर वाहने देखील धावत आहेत. उर्वरित चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गती दिलेली असतानाच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कामात कोलदांडाच पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काम थांबवण्याची नामुष्की ठेकाधारक कंपनीवर ओढवली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून ठेकाधारक कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम जोमात सुरू आहे. विशेषतः भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी ३२ मीटर लांबीच्या भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनीने कंबर कसली असून यंत्रणांची दिवस-रात्र घरघर सुरू आहे. यापाठोपाठच कंपनीने भरणे परिसरातील चौपदरीकरणाची अंतर्गत कामेदेखील हाती घेतली आहेत. मात्र, भरणे परिसरातील संपादित जागांवरील अतिक्रमणे अजूनही जैसे-थेच असल्याने चौपदरीकरण कामात अतिक्रमणांचा अडसरच निर्माण झाला आहे.
खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणातील भू-संपादन प्रक्रियेत ८ हजार २१४ जमिन मालकांचा समावेश आहे. खवटी, नातूनगर, कसबा नातू, बोरघर, उधळे खुर्द, कळंबणी बुद्रुक -वाळंजवाडी, जांबुर्डे, मोरवंडे, बोरज, निगडे, दाभिळ, लवेल, असगणी, आवाशी, लोटे, धामणदेवी, घाणेखुंट आदी गावांचा समावेश असलेल्या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भरणे परिसरातील चौपदरीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकाधारक कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, भरणे परिसरातील भू-संपादनातील जमिन मालकांना २ वर्षांपूर्वी मोबदला देवून देखील काही जमिन मालकांनी अद्यापही इमारती तोडलेल्या नाहीत. याशिवाय चौपदरीकरणातील संपादित जागांवरच अनेकांनी दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणांमुळे चौपदरीकरणाच्या कामात ठिकठिकाणी अडथळ्यांचे स्पीडब्रेकर उभा ठाकल्याने ठेकाधारक कंपनी कोंडीत अडकली आहे.
संपादित जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सूचना व नोटीसा बजावून देखील याकडे कानाडोळाच केला जात आहे. याचमुळे दीपावलीनंतर चौपदरीकरणातील संपादित जागांवरील इमारतींसह ठिकठिकाणच्या अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या दोन दिवसापासून भरणेपासून वेरळपर्यंतच्या संपादित जागांवर दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात देखील केली आहे.









