प्रतिनिधी / चिपळूण
नाणार आता गेलंच आहे, मात्र बारसू परिसरातील ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली आहे. त्यानुसार स्थानिक जनतेशी, कंपनीशी चर्चा केली जाणार आहे. प्रकल्पाबाबत स्थानिक सकारात्मक असतील तर सरकार रिफायनरीचा नक्की विचार करेल, असे महत्वपूर्ण विधान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी लोटे येथे केले. त्याचबरोबर लोटेतील कोकाकोला प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून नजीकच्या काळात कोकणात मोठी औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोटेत सीईटीपीने उभारलेल्या राज्यातील पहिल्या हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाणारच्या लोकांनी केलेला विरोध शिवसेनेने स्विकारला, परंतु तोच रिफायनरी प्रकल्प इतरत्र लोकांना हवा असेल तर त्याचा विचार सरकार नक्की करेल. जसे नाणारला स्थानिक जनतेचा विरोध म्हणून प्रकल्प नको तसे स्थानिक जनतेकडूनच प्रकल्पाची मागणी होऊन त्यामध्ये सकारात्मकता असेल तर त्याचा सरकार नक्की विचार करणार आहे. बारसुला एमआयडीसीने आधिसूचना काढून काही जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याठिकणी रिफायनरी प्रकल्प येण्याचा निर्णय झाला तर त्या या भूसंपादनाचा फायदा होऊ शकतो. प्रकल्पांना विरोध होतो. तेथे आम्ही तो लादत नाही. मात्र स्थानिक जनतेची मागणी असेल, सगळ्यांचा पाठिंबा असेल तर हा प्रकल्प होऊ शकतो असेही ते म्हणाले.