प्रतिनिधी / खेड
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटालगतच्या पोलादपूर हद्दीतील धामणदिवीनजीक गुरूवारी पहाटेच्या सुमारास खासगी आरामबसमधून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना चालत्या बसमध्येच लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलादपूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये थरारक पाठलागानंतर एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. घटनेतील दोन वाहने पोलिसांनी जप्त केली असून आणखी ५ जण फरारी आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या ८ प्रवाशांचे २४ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
अशोक धर्मराज जाधव ( ४५, रा. उंबरा-उस्मानाबाद ) असे गजाआड करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार ( सर्व रा. उंबरा – खामकरवाडी. उस्मानाबाद ) अशी फरारींची नावे आहेत. हे सर्वजण फासेपारधी समाजातील असून पोलादपूर पोलिसांकडून फरारींचा कसून शोध घेण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बसचालक सुनील शंकर दामले ( ३५, रा. साखरी – गुहागर ) हा पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची खासगी आरामबसमधून चाकरमान्यांना घेवून मुंबईतून गुहागरला जात होता, पोलादपूर हद्दीतील धामणदिवीनजीक बस आली असता एका प्रवाशास अज्ञात व्यक्ती बसच्या डाव्या बाजुच्या डिकीतील प्रवाशांचे साहित्य रस्त्यावर टाकत असून अन्य व्यक्ती हे साहित्य उचलून नेत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब प्रवाशाने चालकास सांगून बस थांबवण्यास सांगितली असता अज्ञात व्यक्ती फेकलेले साहित्य गाळा करून पसार झाले.
Previous Articleसातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज
Next Article दिल्लीत दिवसभरात 956 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू









