जिल्हाधिकारी -नगर परिषद प्रशासनात चर्चा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या सदंर्भात जिल्हाधकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नगर परिषद प्रशासनासोबत झालेल्या चर्चेदरम्यान नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा मिळावा म्हणून शहरालगतच्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी लक्ष्मीणारायण मिश्रा यांनी रत्नागिरी नगर परिषदेला मंगळवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या विविध प्रलंबित विषयांवरही चर्चा केली. या चर्चेत नगर परिषद हद्द वाढीबाबत खिचपत पडलेल्या प्रस्तावाला गती देण्याचे संकेत मिळाले आहेत. सुमारे 10 वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेच्या हद्दवाढीचा प्रयत्न झाला होता. 15 किमीच्या परिघात येणाऱया ग्रामपंचायतींकडे तसा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. त्यावेळी युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि मुख्याधिकारी एम. व्ही. खोडके यांनी सभेत ठरावाला मंजुरी घेतली आणि जिल्हाधिऱयांमार्फत हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता.
त्या हद्दवाढीच्या प्रस्तावामध्ये शिरगाव, मिऱया, कुवारबाव, मिरजोळे, भाटय़े, फणसोप, खेडशी यासह हातखंबा, सडामिऱया, मिरजोळे, खेडशी, झरेवाडी, पोमेंडी, कुवारबाव, नाचणे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतीनी त्यावेळी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रस्तावाविरुद्ध सरपंचांची बैठक होऊन त्यांनी संघर्ष समितीही स्थापन केली होती. हद्दवाढीला विरोध करण्याच्या ग्रामपंचायतींच्या निर्णयाला त्यावेळी आमदार उदय सामंत यांनीही पाठिंबा दिल्याने हा विषय तिथेच थांबला होता.
नगर परिषद हद्दीला लागून असलेल्या 15 किमी परिघातील 15 ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. त्याद्वारे नगर परिषद ‘क’ दर्जांची महापालिका बनवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी चर्चा करून ग्रामपंचायतींना विश्वासात घेत ना हरकत मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हद्दवाढीचा हा दुसरा प्रयत्न यशस्वी होणार का, यातून कोणती राजकीय पोळी भाजली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









